नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या बिनधास्त, स्पष्टवक्ते शैलीसाठी आणि कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत प्रकल्पांचा अचूक अंदाज बांधण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. केंद्र सरकारमध्ये रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, सेतू, उड्डाणपूल आणि लॉजिस्टिक कॉरिडॉर यांसारख्या कोट्यवधींच्या कामांची आखणी करताना खर्च, वेळ आणि गुणवत्तेचा समतोल साधला आहे.

मोठ्या प्रकल्पांबाबत ठाम भूमिका मांडणे, अपयशाची भीती न बाळगता निर्णय घेणे आणि कामाच्या प्रगतीचा थेट आढावा घेणे ही गडकरी यांच्या नेतृत्वशैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. सार्वजनिक-खासगी भागीदारी, नावीन्यपूर्ण आर्थिक मॉडेल्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांनी पायाभूत क्षेत्राला वेग दिला आहे. नागपूरशी घट्ट नाते असलेल्या गडकरी यांची बिनधास्त भाषा, प्रामाणिक मांडणी आणि कामाचा ठोस अंदाज यांमुळे विकासाभिमुख नेतृत्वाचे प्रभावी प्रतीक म्हणून त्यांची राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.

गडकरी त्यांच्या भाषणात कोट्यावधीच्या कामाबाबत सातत्याने बोलत असतात. पैशांची कमतरता नाही अशाप्रकारचे विधान ते नेहमी करत आले आहेत. एक-दोन कोटी रुपयांच्या छोट्या कामासाठी माझ्याकडे येऊ नका, १००-२०० कोटी रुपयांचे काही असेल तर सांगा, अशाप्रकारचे वक्तव्यही गडकरी यांनी अनेक भाषणांमध्ये केले आहे. मात्र कोट्यावधीची गोष्टी करणाऱ्या गडकरींना त्यांच्यावर असलेल्या कर्जाची चिंता होती, अशी माहिती खुद्द गडकरींनी दिला. आता या कर्जाचे काय झाले याचा उलगडाही गडकरींनी केला आहे.

काय म्हणाले गडकरी?

‘मी खूप खुशीत असतो, माझ्या गावात. मला शेतात आणि माझ्या गावात सगळ्यात जास्त आनंद मिळतो. तिथेच राहून जास्तीत जास्त काम करायची इच्छा आहे. बाकी मला माझ्या औकादीपेक्षा खूप जास्त मिळाले आहे. इतकी ढाराढूर झोप लागते की तुम्हाला सांगू नाही शकत. मी सकाळी अडीच तास व्यायाम करतो आणि आज मी उठलो तर मला कळले नाही की मी कुठे आहे. त्याचे कारण म्हणजे भविष्याचा काहीही विचार नाही. आर्थिकदृष्ट्या कर्ज खूप होते, तेव्हा मला टेंशन राहिले. आता मुले सांभाळतात, कर्जही आता जवळपास नाही, तर मला चिंता नाही. खुश आहे मी आणि खूप लोकांना खरे नाही वाटत पण हे सत्य आहे. माझा रोज घरात एकच विचार विनिमय चालतो की सकाळी पंडित येऊन म्हणाला की आज क्या खाना है? मग मी, रोज बायकोचा आणि माझा संवाद आहे, युट्युबमध्ये पाहतो की मेथी अशी टाकली, रोज नवीन नवीन प्रयोग करतो. आज समोसे बरोबर नव्हते, तर ते कसे करावे हे सांगितले. तर साधारणत: त्याच्यातच माझा वेळ जातो. माझे लाईफ चांगले आहे’, असे गडकरी म्हणाले.