नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वक्तव्ये म्हणजे परखड भाष्य, स्पष्टवक्तेपणा आणि मिश्किल टोले यांचा अनोखा संगम असते. राजकीय नेत्यांना नाव न घेता त्यांच्या खास शैलीत चिमटे काढण्यापासून ते विकासकामांतील त्रुटींवर जाहीर नाराजी व्यक्त करीत गडकरी अधिकाऱ्यांनाही फटकारतात. त्यांनी आपल्या रोखठोक शैलीतून नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास करतात, असे विधान रविवारी केले.

प्रयोग करतो आणि त्यात यश मिळते म्हणून….

नागपुरातील वर्धा मार्गावरील एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनच्या सभागृहात रविवारी सायंकाळी असोचॅम आणि महाराष्ट्र शासनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकसित विदर्भ शिखर परिषद २०२६ मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या परिषदेत ‘फार्म टू फ्युएल’, ‘वेस्ट टू वेल्थ’ आणि ‘नवीकरणीय ऊर्जा’ या विषयांवर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. शेतीवर बोलत असताना त्यांनी शेतीत प्रयोगाच्या आवश्यकतेवर भर दिला. याच दरम्यान ते म्हणाले, नेता असूनही लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, कारण मी आधी प्रयोग करतो, असे नमूद करीत त्यांनी त्यांच्या शेतातील उदाहरणे दिली. माझ्या शेतात ४०० क्विंटल तुर झाली. ती सेंद्रिय दाळ विकत आता विकत असून त्याला त्याला बाजारात मागणी वाढल्याचे गडकरी म्हणाले.

‘शेतकरीनिर्मित पेट्रोलवर उडणार विमान’

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जा दाता आहे. त्याने तयार केलेल्या इथेनॉलवर चारचाकी, दुचाकी धावत आहे. आता हवाई इंधन तयार करायचे आहे. नागपुरातील आंतराष्ट्रीय विमानतळाचा विकास झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तयार केलेल्या पेट्रोलवर विमान उडेल, असेही गडकरी यांनी सांगितले. विदर्भातील शेती, कोळसा, पर्यटन, संशोधन, उद्योगाच्या क्षमतेकडे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, शेतकऱ्याने तयार केलेल्या इथेनॉलवर २०२२ पासून २० कोटी दुचाकी धावत आहे. कुठलाही बिघड नाही. बाजारात बजाज, टीव्हीस, होंडाच्या पूर्णपणे ई-२० वर चालणाऱ्या दुचाकी आल्या आहेत. इथेनॉलचे दर ७५ रुपये प्रति लिटर आहे. मोठी बचत होत आहे. दहा राष्ट्रीय महामार्गावर अनेक कंपन्यांना सोबत घेऊन ट्रक हायड्रोजनवर धावतील, यावर काम सुरू आहे. हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. यात ग्रीन हायड्रोजनही आहे. शेतकऱ्यांना ते तयार करता येणार आहे. कार्बनडाय ऑक्साईड मोठी समस्या आहे. परंतु कार्बनडाय ऑक्साईड व हायड्रोजन एकत्र आणले तर युरिया तयार होतो. यात संशोधन झाल्यास एलपीजी गॅसही तयार होऊ शकते, असे गडकरी म्हणाले.