Nitin Gadkari : राज्यातील इतर नेत्यांना त्यांच्या मुलांची चिंता आहे. पण आम्हाला नागपूरच्या गरीब तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, याची चिंता आहे, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. विशेष हे विधान करत असताना भाजपाने त्यांच्या उमेदवार यादी जवळपास २० नेत्यांच्या कुटुबांतील सदस्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या विधानानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?
नितीन गडकरी आज देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी नागपूरमधील जनतेला सबोधित केलं. “भाजपाने नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं केली. जर नागपूरच्या जनतेने आम्हाला ताकद दिली नसती, तर आम्ही नागपूरचं चित्र बदलू शकलो नसतो. आतापर्यंत तुम्ही जो विकास बघितला, तो केवळ ट्रेलर होता. इथून पुढे तुम्हाला खरा सिनेमा बघायला मिळेल. पुन्हा नागपूरच्या जनतेने भाजपाला आशीर्वाद दिला, तर दुप्पट वेगाने विकासकामे होतील. आम्हाला नागपूरला देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ आणि प्रदुषणमुक्त शहर बनवायचं आहे”, असं नितीन गडकरी म्हणाले.
हेही वाचा – भाजपाच्या ८० आमदारांना पुन्हा तिकीट; उमेदवारी देताना भाजपाने यावेळी अधिक खबरदारी का घेतली?
“आम्हाला गरीब तरुणांच्या रोजगाराची चिंता”
पुढे बोलताना त्यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही भाष्य केलं. “नागपूरमध्ये मिहान सुरु झालं. मिहानमध्ये आतापर्यंत ७८ हजार नागपूरच्या आणि विदर्भाच्या भूमीपूत्रांना रोजगार मिळाला आहे. बाकीच्या नेत्यांना त्यांच्या मुलांची चिंता आहे. पण आम्हाला नागपूरच्या गरीब तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, याची चिंता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने महाराष्ट्राचे नेतृत्व करणारा एक सक्षम नेता नागपूरने दिला आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – घराणेशाही आणि बाहेरून आलेल्यांचे लाड होत असल्याने भाजप निष्ठावंतांमध्ये असंतोष
देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना केलं लक्ष्य
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना विरोधकांना लक्ष्य केलं. “मी विरोधकांबाबत जास्त काही बोलणार नाही. विरोधकांचा पराभव करण्यासाठी लाडक्या बहिणी पुरेशा आहेत. ज्या लाडक्या बहिणीच्या तोंडचा घास पळवण्याकरिता सुनील केदार, नाना पटोलेंसारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी नागपूरच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्या लाडक्या बहिणीच त्यांना पुरून उरतील”, अशी टीका त्यांनी केली. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिममधून विजयाचा विश्वासही व्यक्त केला. “या निवडणुकीत सहाव्यांदा मला दक्षिण पश्चिमची जनता मला आशीर्वाद देणार आहे”, असे ते म्हणाले.