लोकसत्ता टीम
नागपूर: दंत क्षेत्रात रोजगाराची मोठी संधी आहे. त्यामुळे या शाखेच्या विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरीमागे धावण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात शुक्रवारी झालेल्या दंत परिवेक्षण शास्त्रचे सेंटर फॉर एक्सलेंस, कार्बन मोनाक्साईड मॉनिटर क्लिनिक, सीओ- २ लेझर मशिनच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने माजी आमदार आशीष देशमुख, आदिवासी विभागाच्या नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर उपस्थित होते.
आणखी वाचा-“सध्या जे सुरू आहे ते फक्त सत्ताकारण”, नितीन गडकरी असं का म्हणाले?
गडकरी पुढे म्हणाले, एमबीबीएस डॉक्टरांपेक्षा दंतच्या डॉक्टरांना सध्या जास्त मागणी आहे. दंतच्या डॉक्टरकडे एकदा रुग्ण गेल्यास त्याला उपचारासाठी किमान १५ ते २० वेळा डॉक्टरकडे जावे लागते. दरम्यान मेक इन इंडियाअंतर्गत आता दंत उपचारासाठी लागणारे सयंत्र आता विशाखापटनममध्ये तयार केले जात आहे. पूर्वी हे यंत्र जर्मनी वा इतर देशातून आणावे लागत होते. दंतचे रुग्ण वाढत असल्याने निश्चितच या क्षेत्राशी संबधित रोजगारही वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी चांगली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शासकीय नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा नोकरी देणारे बनून स्वयंरोजगाराकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले.
