नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ‘लोकराज्य’ मासिकाच्या एप्रिल २०२६ च्या अंकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र उलट्या स्वरूपात प्रकाशित झाल्याचा मुद्दा गुरुवारी विधिमंडळात गाजला. काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत २४ तासांच्या आत चौकशी करून आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
काय आहे नेमके प्रकरण?
स्थगन प्रस्तावावर बोलताना डॉ. नितीन राऊत यांनी ‘लोकराज्य’ हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकृत प्रकाशन असून त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र उलट्या स्वरूपात छापले जाणे ही अत्यंत गंभीर आणि अक्षम्य चूक असल्याचे म्हटले. छायाचित्रासह पार्श्वभूमीवरील ‘भारतरत्न’ चिन्हही उलटे प्रकाशित झाल्यामुळे चुकीचा संदेश समाजात जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
शासनाने सभागृहात बिनशर्त माफी मागावी
तसेच, या प्रकारामुळे कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा दावाही त्यांनी सभागृहात केला. प्रकाशन प्रक्रियेत अनेक टप्प्यांवर प्रूफ तपासणी होत असताना अशी चूक कशी झाली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी शासनाने सभागृहात बिनशर्त माफी मागावी, बाजारातील सर्व छापील प्रती मागे घेऊन नष्ट कराव्यात, ऑनलाइन पीडीएफ आवृत्ती हटवावी, तसेच संबंधित संपादक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही डॉ. राऊत यांनी केली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात दिवसांत चौकशी पूर्ण करून अहवाल सभागृहात सादर करावा, अशीही त्यांची मागणी होती.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले ?
यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र चुकीच्या पद्धतीने प्रकाशित झाल्याची बाब मान्य केली. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. येत्या २४ तासांत दोषींवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. या प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आता चौकशी अहवालात कोण जबाबदार ठरते आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
