नागपूर : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व सांस्कृतिक आशीष शेलार यांच्या सांप्रदायिक वक्तव्यावरून काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. शेलार यांनी २ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर नागपूरमधील मुस्लीम मतदारांविषयी केलेल्या विधानावरून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. राऊत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, शेलार यांनी ‘उत्तर नागपूरमध्ये ८,३४२ मुस्लिमांची बोगस मते आहेत, असे वक्तव्य केले होते. हे विधान धार्मिक समुदायावर लक्ष केंद्रित करणारे, समाजात द्वेष निर्माण करणारे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा हेतू दर्शविणारे आहे.
मतदार नोंदणी आणि पडताळणीचे कार्य हे राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येते. अशा स्थितीत शेलार यांनी केलेले विधान आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न निर्माण करणारे असून, निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न आहे, असेही तक्रारीत म्हटले.
डॉ. राऊत यांनी नमूद केले आहे की, लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ च्या कलम १२३(३) नुसार धर्म, जात, समुदाय किंवा भाषा यांच्या आधारावर मत मागणे वा मतदारांमध्ये धार्मिक विद्वेष पसरवणे हे निवडणूक गुन्हा मानला जातो. त्यामुळे शेलार यांचे वक्तव्य हे निवडणूक आचारसंहितेचे आणि कायद्याचे थेट उल्लंघन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्यांनी आयोगाला विनंती केली आहे की, अशा प्रकारची वक्तव्ये केवळ सामाजिक तणाव वाढवतात आणि निवडणुकीच्या निष्पक्षतेवर परिणाम करतात. त्यामुळे आशिष शेलार यांच्या विरोधात तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारीची प्रत मुख्यमंत्री, गृह विभाग तसेच पोलीस महासंचालक यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यावर निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
