नागपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर नागपूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांचे समर्थक मिलिंद सोनटक्के यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरचे असूनही गेल्या तीन विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर नागपूरमध्ये आघाडी घेता आलेली नाही. या मतदारसंघात भाजपला नेहमीच तुलनेने कमी मतदान मिळाले आहे.

भाजपने येथे विविध प्रकल्पांच्या माध्यमातून, तसेच मतविभाजन घडवून आणण्यासाठी अनेक उमेदवार मैदानात उतरवून, पूर्ण ताकद लावूनही निर्णायक मताधिक्य मिळवता आलेले नाही.

याच पार्श्वभूमीवर, आता महापालिका निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या पक्षात सामावून काँग्रेसला कमकुवत करण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले आहेत. वॉर्ड क्रमांक १ मधील मातेश्वरी भवन येथे आयोजित भाजप प्रवेश सोहळ्यात सोनटक्के यांनी अधिकृतपणे भाजपची सदस्यता घेतली. त्यांच्या सोबत पत्नी मधुरी सोनटक्के तसेच काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांना धक्का मानला जातो.

या कार्यक्रमाचे आयोजन वॉर्ड अध्यक्ष खेलेन्द्र बिठले यांनी केले होते. सोहळ्यात भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, उत्तर नागपूरचे माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी झोन अध्यक्ष प्रमिला मातरणी, भाजप नारी मंडळ अध्यक्ष संजय चौधरी, माजी नगरसेविका सुषमा चौधरी, वॉर्ड अध्यक्ष जगदीश वंजानी, तसेच आकाश जठाले यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मिलिंद सोनटक्के यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नागपूर महापालिकेची तीन वेळा निवडणूक लढवली दोन वेळा पराभूत झाले. भाजपमध्ये प्रवेश करताना सोनटक्के म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकार्यासोबत काम करण्याची इच्छा असल्याने मी आणि माझे सहकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहोत.” त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला उत्तर नागपूरातील संघटनात्मक शक्ती वाढण्यास मदत होणार आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, उत्तर नागपूरमध्ये आगामी निवडणुकीत हा प्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का ठरू शकतो. आगामी काळात दोन्ही पक्षांमध्ये नवीन शक्तिसंतुलन दिसण्याची चिन्हे दिसत आहेत.