अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करून कृषी अभियांत्रिकीचे गुण केवळ १६ ठेवण्यात आले आहेत. कृषी अभियांत्रिकीवर हा अन्याय असल्याचा आरोप करून राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हा अन्याय दूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>“…तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका”, प्रविण तोगडीयांचं मोठं विधान, म्हणाले, “मोदी-शाहांनी…”

राज्यातील कृषी विद्यापीठात कृषी व कृषी अभियांत्रिकी अशा दोन विद्याशाखा मुख्यत्वे कार्यरत आहेत. कृषी व कृषी अभियांत्रिकी यांचा स्वतंत्र वैकल्पिक विषय कृषी सेवा परीक्षेसाठी ठेवण्यात आलेले होते. लोकसेवा आयोगाने ११ फेब्रुवारी २०२२ ला कृषी सेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल केला. नवीन अभ्यासक्रमात पेपर एक सामान्य कृषी आणि पेपर दोन कृषी विज्ञान व तंत्रज्ञान आहे. त्यात पेपर दोनमध्ये कृषी विषयासाठी २०० पैकी १२८ गुण, तर कृषी अभियांत्रिकीसाठी विषयासाठी २०० पैकी केवळ १६ गुण ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २० एप्रिल २०२२ रोजी कृषी अभियांत्रिकी शाखेतील उमेदवारांना जुन्या अभ्यासक्रमामध्ये अवाजवी लाभ मिळत असल्याचे राज्यपालांना सांगितले. वास्तविक कृषी विभागात कार्यरत १६७९ पदांपैकी केवळ २.४५ टक्के जागांवर अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत, असा दावा राज्य कृषी अभियांत्रिकी संघटनेने केला आहे.

हेही वाचा >>>सावित्रीच्या लेकीची परदेशात दखल; गडचिरोलीच्या ‘टॅक्सी’चालक तरुणीला इंग्लंडच्या विद्यापीठात प्रवेश

कृषी विभागामार्फत राज्यातील योजनांचा विचार केल्यास ५० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च कृषी अभियांत्रिकी संबंधित योजनांवर होतो. त्यामुळे कृषी अभियांत्रिकीचा सहभाग वाढणे अपेक्षित आहे. १ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालाद्वारे पात्र उमेदवारांच्या संख्येच्या आधारावर स्वतंत्र आढावा घेण्यात येईल व अभ्यासक्रम पुन्हा सुधारित करण्याचा आयोगाकडून विचार करण्यात येईल, असे लोकसेवा आयोगाने राज्यपालांच्या कार्यालयाला ३० सप्टेंबर २०२२ रोजी कळवले. ३० डिसेंबरला २०३ पदांच्या पदभरतीच्या परीक्षेचा निकाल ३० डिसेंबरला जाहीर केला असून त्यात केवळ १.५ टक्के कृषी अभियांत्रिकीचे उमेदवार आहेत. कृषी अभियांत्रिकीच्या उमेदवारांवर अन्यायाचा मुद्दा प्रलंबित असतांनाच आयोगाने २१३ पदांच्या दुसऱ्या पदभरतीसाठी १७ डिसेंबरला पूर्व परीक्षा घेतली. कृषी अभियांत्रिकीवर अन्यायाचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर देखील होत असून असंख्य जागा रिक्त राहिल्या आहेत. राज्य कृषी सेवा परीक्षेमध्ये कृषी व कृषी अभियांत्रिकी यांचे पूर्वी प्रमाणेच विषय ठेवण्यात यावेत व तोपर्यंत राज्य कृषी सेवेच्या दोन्ही पदभरतीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे.

कुलगुरूंना विश्वासात घ्यावे
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेत कृषी अभियांत्रिकी शाखेचा पर्यायी विषय इतर शाखांच्या वैकल्पिक विषयांप्रमाणेच समाविष्ट केला जावा व कोणताही बदल करतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना विश्वासात घ्यावे, अशी मागणी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Njustice on agricultural engineering in agricultural services examination syllabus ppd 88 amy
First published on: 06-02-2023 at 14:55 IST