scorecardresearch

मान्सूनच्या तोंडावर नाले सफाईचा मुहूर्त

गेल्या पाच वर्षांपासून नदी सफाई अभियान सुरू आहे

मान्सूनच्या तोंडावर नाले सफाईचा मुहूर्त
गेल्या पाच वर्षांपासून नदी सफाई अभियान सुरू आहे.

नदी शुद्धिकरण्याच्या उद्देशाला हरताळ

शहरातील नदी, नाले, पावसाळी नाल्यांच्या साफ-सफाईची कामे मान्सून येण्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना पावसाळा तोंडावर आल्यावर ही कामे केली जात असून नद्यांमधून उन्हाळाभर काढण्यात आलेली माती, गाळ आता पावसाच्या पाण्यामुळे परत नदीच्या पात्रात येण्याची शक्यता आहे. यामुळे नदी स्वच्छेच्या मूळ उद्देशालाचा हरताळ फासला जाण्याची शक्यता आहे.

सर्वसाधारणपणे ७ जूनला पावसाळा प्रारंभ होते. त्यानुसार मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात मान्सूनपूर्व कामे ओटोपतील असे नियोजन केले जाते आहे. परंतु शहरातील नदी, नाले स्वच्छ करणे, मेन होलवरील तुटलेली झाकणे बदलण्याबाबत बैठक गेल्या बुधवारी घेण्यात आली आणि त्यात पावसाळ्यापूर्वी सर्व कामे करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. त्यामुळे पावसाळी नाले सफाई आणि नद्यांच्या काठावर गोळा करण्यात आलेला गाळ इतरत्र हलवण्याचे काम पावसापूर्वी होईल की नाही याबाबत शंका आहे.

गेल्या पाच वर्षांपासून नदी सफाई अभियान सुरू आहे. यंदा १७ एप्रिलपासून या कामाला सुरुवात झाली. मागील वर्षीपासून हे अभियान लोकसहभागातून राबवण्यात येत आहे. यंदा यासाठी वेगवेगळ्या शासकीय विभागाकडून तसेच खासगी उद्योजकांकडून १५ पोकलेन, ३० जेसीबी, ५० टिप्परची व्यवस्था करण्यात आली. या उपकरणांवर सुमारे ४० लाख रुपयांचा इंधन खर्च गृहित धरण्यात आला आहे. इंधनाचा खर्च सीएसआर फंडमधून केला जाणार आहे.

नाग, पिवळी आणि पोहरा नदीची स्वच्छता करण्यात येत आहे. पात्रातील कचरा, गाळ, माती काढून काठावर गोळा करण्यात आला आहे. नदीला पूर आल्यास ही माती पुन्हा नदीत येणार आहे. हे होऊ नये म्हणून माती, गाळ इतरत्र हलवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परंतु मुद्दा असा आहे की, येत्या एक-दोन दिवसात ही सर्व कामे पूर्ण होणे शक्य आहे काय? महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या आजवरचा अनुभव बघता कितीही विलंबाने मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ केले तरी ती वेळेत पूर्ण झाल्याचे दाखवण्यात येते. त्यामुळे दरवर्षी पावसाळी नाले सफाई, मेन होलवरील झाकणे बदलण्यात येत असले तरी पावसाळ्यात नाल्या तुंबल्याने सखल भागात पाणी साचणे, घरादारात पाणी शिरणे हे प्रकार घडत असतात. मान्सूनच्या तोंडावर ही कामे हाती घेण्यात आल्याने परत ती स्थिती होणार आहे. यावेळी सिमेंट रस्त्याच्या बाजूच्या पावसाळी नाल्या स्वच्छ करण्याचे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहे. परंतु अद्याप एकाही कंत्राटदाराने पावसाळी नाल्या स्वच्छ केलेल्या नाहीत.

केवळ ‘मेन होल’जवळील गाळ

दरवर्षी पावसाळी नाल्या सफाई केली जाते. परंतु ‘मेन होल’वरील झाकण काढून त्या भागातील गाळ काढला जातो. संपूर्ण नाली साफ केली जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी नाल्या तुंबल्या जातात. यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरते. त्यानंतर महापालिकेला जाग येते. यावर्षी देखील खरबी रोडवरील पावसाळी नाल्याचे सफाई करण्यात आली. परंतु केवळ ‘मेन होल’चे झाकण काढून तेवढाच गाळ काढण्यात आला, असे या वस्तीतील प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2017 at 02:44 IST

संबंधित बातम्या