scorecardresearch

नागपूर : स्थापनेनंतर प्रथमच ‘एनएमआरडीए’चा पायाभूत सुविधांवर भर ; शहरालगत रस्ते, पाण्याची सोय

एनएमआरडीए अस्तित्वात आल्यानंतर २०१८-१९ मध्ये पहिले अंदाजपत्रक सादर करण्यात आले.

nmrda
( संग्रहित छायचित्र )

अमृत-२ योजनेमध्ये ३९० कोटींचा प्रस्ताव
नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणने (एनएमआरडीए) मेट्रो रिजनमधील नागपूर शहरालगतच्या परिसरात रस्ते, पाणी आणि मलनिस्सारण वाहन्या विकसित करण्याचे नियोजन केले असून यातील पिण्याचे पाणी आणि मलवाहिनीचे काम अमृत-२ योजनेअंतर्गंत करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. काही भागातील पांदण रस्त्यांचे खडीकरण करण्यासाठी १४३ कोटींची निविदा काढण्यात आली आहे.

एनएमआरडीए अस्तित्वात आल्यानंतर २०१८-१९ मध्ये पहिले अंदाजपत्रक सादर करण्यात आले. तेव्हापासून तर २०२२ पर्यंतच्या अंदाजपत्रकातील निधीतून मेट्रो रिजनमध्ये फार पायाभूत सुविधा विकसित होऊ शकल्या नाहीत. काही गावांमध्ये अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) अंतर्गत पाणी पुरवठा करण्यात आला. परंतु अजूनही अनेक गावे पायाभूत सुविधांपासून दूर आहेत. एनएमआरडीएने यावर्षी १४३ कोटी रुपये खर्च करून कच्चे रस्त्यांचे खडीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरालगतच्या परिसरात दळणवळण सोयीचे होईल आणि त्या भागात वस्त्या अधिक गतीने विकसित होतील.

शेत रस्त्यांचे खडीकरण सात मीटर रुंद राहणार आहे. पण, विकास आराखड्यानुसार २४ मीटरवर मैलाचा दगड लावून अतिक्रमण रोखण्यात येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरालगतच्या हुडकेश्वर, नसराळा, बेसा, बेलतरोडी, शंकरपूर, भिलगाव, कापसी, भवरी, गुमथाळा, घोरपड, शिरपूर, कांद्री, अंबाडी, मोहगाव, पिंपळा, घोराडे, पांजरी या भागात अनेक अभिन्यास (लेआऊट्स) आहेत. तसेच गृह निर्माण प्रकल्प सुरू आहेत. तिकडे पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्या गावांचा विकास होणार आहे. या भागात ५५ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यावर १४३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शहरालगतच्या भागात रस्ते, पाणी, मलनिस्सारण वाहिन्यांची सोय झाल्यास गृहनिर्माण कार्याला गती येईल. त्यामुळे घरांच्या किमती कमी होतील, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

“शेत रस्त्यांच्या खडीकरणासाठी १४३ कोटी रुपयांची निविदा पुढील आठवड्यात काढण्यात येणार आहे. अमृत-२ योजनेअंतर्गत पिण्याचे पाणी आणि मलनिस्सारण वाहिन्यांसाठी ३९० कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे पुढील दीड-दोन वर्षांत मेट्रो रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित होतील. त्याचा लाभ त्या भागातील नागरिकांना होईल.”– मनोजकुमार सूर्यवंशी, महानगर आयुक्त, एनएमआरडीए.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nmrda emphasis on infrastructure suburban roads water supply 390 crore proposal in amrut scheme amy