नागपूर : आधुनिक जीवनशैलीमुळे नवीन खाद्यसंस्कृती जन्माला आली आहे. यात जंक फूडचे महत्त्व वाढत आहे. या जंक फूडने आता शालेय विद्यार्थ्यांच्या डब्यातही जागा मिळवली आहे. परंतु, त्याचा धोकादायक परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे शाळेच्या डब्यात जंक फूड नव्हे तर सकस पोषण आहार दिला गेला पाहिजे, असे मत शासनाची पाककृती समिती व परसबाग, खान्देश समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले.

विष्णू मनोहर म्हणाले, शाळेतील परसबागेत उगवलेल्या लाल भोपळा, दुधी भोपळा, शेवगा इत्यादी भाज्या माध्यान्ह भोजनाला अधिक पौष्टिक करतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासोबतच त्यांना भाज्या कुठे आणि कशा लागतात याचे ज्ञान मिळेल.

हेही वाचा – मुंबईच्या जोगेश्वरीतून सायबर लुटारूंची आंतरराज्यीय टोळी जेरबंद, नऊ आरोपींचा समावेश

सरकारी शाळांमध्ये २०२४-२५ या सत्रापासून तांदूळ, डाळ, शेंगदाणे आणि भाज्यांसह कडधान्ये आणि गोड पदार्थ अशा एकूण १५ पौष्टिक पदार्थांचा समावेश असलेला ‘पोषण आहार’ लागू करण्यात आला आहे. माध्यान्ह भोजनाच्या यादीत बदल करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनात आहारतज्ज्ञांचा समावेश असलेली पाककृती समिती स्थापन करण्यात आली. या समितीने माध्यान्ह आहारासाठी २५ पौष्टिक पाककृतीची नावे सुचवली. हे पदार्थ बचतगटांच्या माध्यमातून तयार करून त्यांची कॅलरीज, फायबर, आयर्न आदी पौष्टिक मूल्ये तपासण्यात आली व नंतर त्यांचे मंत्रालयात प्रदर्शन भरवण्यात आले. विविध मान्यवरांनी केलेल्या परीक्षणानंतर त्यातून १५ पाककृती पोषण आहारासाठी निवडण्यात आल्या. पिझ्झा, मेगी, नुडल्स आदी जंक फूड देण्यापेक्षा कडधान्यापासून तयार होणारे पदार्थांच्या पाककृती निवडण्यात आल्या. खिचडी किंवा वरण भात खाऊन कंटाळलेल्या शालेय विद्यार्थ्यांना आता पुलाव, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूरपुलाव, अंडा पुलाव, मसाले भात, मूग डाळ खिचडी, बिन्स खिचडी, मूंग शेवगा डाळ आणि भात, कडधान्ये, केळी, अंडी आणि त्यासोबत, तांदळाची खीर, मिलेट पुडिंगदेखील मिळणार आहेत. अतिरिक्त तांदळाची इडली देखील तयार करता यावी, या उद्देशाने प्रत्येक शाळेला इडली पात्र इ. साहित्य दिले जावे अशी शिफारस करण्यात आली आहे.

कुंडीत लागतील भाज्या

परसबाग निर्मितीसाठी समितीने नागरी भागांतील शाळांची पाहणी करून परसबाग निर्माण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांना सादर केल्या. त्यानुसार ज्या शाळांमध्ये भरपूर जागा आहे तिथे परसबाग तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून इतर शाळांतील विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने घरी कुंडीतच शक्य त्या भाज्यांचे उत्पादन घ्यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानातही भर पडेल आणि त्यांना आर्थिक लाभही होऊ शकेल. परसबागेचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेतील शेतीविषयक तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. याशिवाय, भाज्या व वाया गेलेल्या अन्नापासून खत तयार करण्याचे देखील प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे विष्णू मनोहर यांनी सांगितले.

हेही वाचा – नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरींची चौकशी सुरूच राहणार; न्यायालयाचा अंतरिम स्थगिती देण्यास…

बहुतेक शाळांमध्ये उपाहारगृह सुरू करण्यात आले असून तेथे बटाटावडा, कचोरी, वेफर्स किंवा अन्य जंक फूड असतात. यावर बंधने आणली पाहिजे. प्रत्येक शाळेला खाद्यपदार्थांची यादी दिली जाणार आहे. त्याप्रमाणे खाद्यपदार्थ शाळांच्या उपाहारगृहात ठेवावे, असे आवाहनही मनोहर यांनी केले.