नागपूर : तेलंगणामधील महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रचाराला जाण्याची आवश्यकता नाही, असा टोला काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
तेलंगणातील जनतेने आधीच आपला निर्णय घेतला असून बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या प्रचाराचा फारसा परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी तेलंगणात वेळ घालवण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
महाराष्ट्रात शेतकरी, बेरोजगारी, महागाई आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. या प्रश्नांवर सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यातील जनतेला दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत, तर दुसरीकडे सत्ताधारी नेते बाहेरील राज्यांतील निवडणुकीत व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधी महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्रात तीन लाखांहून अधिक कामांवर परिणाम होणार असून रोजगार हमी योजनेची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, अशी तीव्र टीका काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
१२० दिवसांची कामाची मर्यादा असूनही हाताला काम मिळत नसेल, तर अशा योजनेचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अटी-शर्तींमुळे अनेक ठिकाणी कामेच सुरू करता येत नसून सुमारे तीन लाख रोजगारांना ब्रेक लागल्याचा दावा त्यांनी केला. पूर्वी १०० दिवसांची रोजगार हमी होती, आता ती योजना बंद करण्याच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी शेतकरी कर्जबाजारीपणावरही सरकारवर टीका केली. राज्यातील शेतकऱ्यांवर सुमारे २ लाख ९१ हजार कोटी रुपयांचे कर्ज असूनही कर्जमाफी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असला, तरी ‘कर्जमाफी व्यवहार्य नाही,’ असे केंद्र सरकारने स्पष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्याची ऐपत नाही आणि केंद्राची दानत नाही, अशा परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असा इशाराही त्यांनी दिला. यापुढे जाऊन मोदी सरकारने अमेरिकेशी केलेला शेतीविषयक करार अत्यंत धोकादायक असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. या निर्णयाचे परिणाम तात्काळ दिसणार नसले, तरी पीक बाजारात आल्यानंतर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे परिणाम दिसून येतील, असे ते म्हणाले.
भारताकडून होणाऱ्या निर्यातीवरील शुल्क १८ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवून अमेरिकेतील शेतमालावर शून्य टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे. यापूर्वी हे शुल्क ११० ते १२० टक्क्यांपर्यंत होते. त्यामुळे अमेरिकेतील कापूस, सोयाबीन, मका मोठ्या प्रमाणावर भारतात येईल आणि देशांतर्गत शेतमालाला बाजार मिळणार नाही, असा आरोप त्यांनी केला.
अमेरिकेतून गहू १,५०० रुपयांत, सोयाबीन दोन हजारांत, कापूस तीन हजारांत आणि मका १,२०० रुपयांत उपलब्ध होत असेल, तर महाराष्ट्रातील आणि देशातील शेतकऱ्यांनी कुठे जायचे, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. खतावरील सबसिडीही कमी करण्यात आल्याने उत्पादन खर्च वाढत असून, शेतकरी अडचणीत सापडत असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफी नाही आणि शेतमालाला हमीभावही नाही, अशी शेतकरीविरोधी भूमिका केंद्र सरकारची असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
चंद्रपूर महापौरपदाचे चित्र स्पष्ट
स्थायी समिती अध्यक्षपद सहकार्य करणाऱ्या पक्षाला देण्याचा निर्णय झाला असून चार महिला नगरसेविकांपैकी महापौर निवडली जाणार आहे. धानोरकर हे महापौरपद निश्चित करतील, तर उपमहापौरपदासाठी वसंता देशमुख यांचा अर्ज राहणार असल्याचे ठरले आहे. महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. अडीच वर्षाने नवीन आरक्षण काढले जाते, असेही ते म्हणाले.
