नागपूर : खाते वाटप लवकरच होईल, काळजी करू नका. आम्ही पेपर फोडला तर तुम्हाला काम शिल्लक राहणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांनाच टोला लगावला. फडणवीस गुरुवारी रात्री नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

मुंबईतील मेट्रो कारशेडबाबत ते म्हणाले, केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कांजूर मार्गाचा आग्रह धरला. आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कारशेडचे काम चार वर्षे थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे पैसे जनतेच्या खिशातील आहे आणि ते अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळातही महिला नव्हती – मुनगंटीवार

महाविकास आघाडीचे पहिले मंत्रिमंडळ तयार झाले तेव्हा त्यात एकही महिला नव्हती. आमच्याकडे एक बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडे आहेत हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. राजकीय अल्झायमर होता कामा नये, अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले. नागपुरातील भाजप कार्यालयात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मंत्रिमंडळ नव्हते तेव्हाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम करतच होते.  मंत्रिमंडळाच्या आतापर्यंतच्या सर्व बैठकीमध्ये आम्ही भरभरून निर्णय घेतले. आता एक-दोन दिवसांत खातेवाटप होईल. कोणी कितीही प्रयत्न केले, तरी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये दुरावा निर्माण होणार नाही, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान होतील, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. शरद पवार संकल्प करणारे नेते आहेत. देशाचे पंतप्रधान व्हावे असा त्यांचा संकल्प होता. राज्याचा मुख्यमंत्री व्हावा असा संकल्प अजित पवार यांचा आहे. पण हे संकल्प त्यांनी करून चालणार नाही तर जनतेने हा संकल्प घ्यायला पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.