राज्यातील चार शहरांत ध्वनी प्रदूषण मर्यादेबाहेर ; मुंबई, सोलापूर, नाशिक आणि अमरावतीचा समावेश

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी प्रदूषणासाठी निकष घालून दिले असले तरीही महाराष्ट्रात या निकषाचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे.

नागपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी प्रदूषणासाठी निकष घालून दिले असले तरीही महाराष्ट्रात या निकषाचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदवलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या निरीक्षणादरम्यान राज्यातील चार शहरांमध्ये दिवसाच नाही तर रात्रीदेखील ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २१ व २२ फेब्रुवारीला राज्यातील २७ महापालिका शहरांमधील १०२ ठिकाणी ध्वनी प्रदूषणाची सतत २४ तास निरीक्षणे नोंदवली. यात दिवस आणि रात्र तसेच कार्यालयीन आणि सुट्टीच्या दिवसांचा समावेश होता. या निरीक्षणाच्या अहवालातून राज्यातील सर्वच औद्योगिक, व्यावसायिक, रहिवासी आणि शांतता क्षेत्रातील सर्वच प्रभागात ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ  झाल्याचे आढळून आले. मंडळाने २०१९ मध्येही असेच निरीक्षण २७ शहरांमध्ये १०४ ठिकाणी केले होते. तेव्हाही थोडय़ाफार फरकाने या सर्व शहरात ध्वनी प्रदूषण वाढलेले आढळले. गेल्या दहा वर्षांपासून ध्वनी प्रदूषणाच्या या नोंदी घेण्यात येत आहेत. यावर्षीच्या निरीक्षणात दिवसा आणि रात्री ध्वनी प्रदूषणाच्या सुरक्षित मानकापेक्षा अधिक तीव्रतेच्या नोंदी घेण्यात आल्या. यात मुंबई, सोलापूर, नाशिक आणि अमरावती या चारही शहरांमध्ये दिवसा आणि रात्रीचे ध्वनी प्रदूषण सर्वाधिक आढळले.

कोल्हापूर, मुंबई, मीरा भाईंदर, सोलापूर, पुणे, वसई विरार, नाशिक, कल्याण, अमरावती आणि सांगली या शहरात दिवसाचे ध्वनी प्रदूषण सर्वाधिक आहे.  ठाणे, भिवंडी, सोलापूर, मुंबई, नाशिक, नागपूर, चंद्रपूर, मालेगाव, अमरावती, नवी मुंबई या शहरांमध्ये रात्रीचे ध्वनी प्रदूषण सर्वाधिक आढळले. ध्वनी प्रदूषणाला नागरिक गांभीर्याने घेत नाहीत, पण हे अदृश्य प्रदूषण जीवघेणे आहे. ध्वनी प्रदूषणाची पातळी अशीच वाढत राहिल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल, असे ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Noise pollution outside cities state ysh

Next Story
साठवणुकीच्या अयोग्य पद्धतीमुळे राज्यात धान्याची नासाडी सुरूच
ताज्या बातम्या