डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे आवाहन; ‘सरस्वती’ शब्दाला विरोध करणाऱ्यांचा समाचार

शफी पठाण, लोकसत्ता
नागपूर : मला जाहीर झालेल्या पुरस्कारात ‘सरस्वती’ हा शब्द असेल तर यात माझा काय दोष? सरस्वतीला नाकारणे म्हणजेच तिचे अस्तित्व मान्य करणे होय. वैचारिकदृष्टय़ा जग अधिक व्यापक होत असताना आपण अशा एकांगी भूमिकांना चिकटून राहणे योग्य नाही. प्रतीकांच्या या युद्धातून आपण आतातरी बाहेर पडले पाहिजे, अशा शब्दात डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी त्यांना हा पुरस्कार स्वीकारण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा समाचार घेतला. उद्या गुरुवारी नागपुरात विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित सत्कार समारंभाच्या निमित्ताने ते ‘लोकसत्ता’शी बोलत होते.

डॉ. लिंबाळे यांना ज्ञानपीठ इतकाच तोलामोलाचा मानला जाणारा ‘सरस्वती’ सन्मान जाहीर झाला आहे. यातील सरस्वती या शब्दाला आक्षेप घेणाऱ्या काही प्रतिक्रिया डॉ. लिंबाळे यांच्याकडे व्यक्त करण्यात आल्या. दुसरीकडे उद्या नागपुरात त्यांचा सत्कार आयोजित करणाऱ्या विदर्भ साहित्य संघाने याआधी डॉ. यशवंत मनोहरांच्या पुरस्कार नाकारण्याच्या कृतीवर सरस्वती पूजन हा त्यांचा ‘कुळाचार’ असल्याचे ठणकावून सांगितले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. लिंबाळे नागपुरातील सत्कार स्वीकारणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर डॉ. लिंबाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, रिपब्लिकन चळवळीतही असेच नावांच्या गटा-तटावरून समाजाने आपली ऊर्जा वाया घालवली. आता तो प्रतीकांच्या लढाईत गुंतला आहे. मुळातच ‘सरस्वती’ ही काल्पनिक गोष्ट  आहे. अशा काल्पनिक गोष्टीसाठी किती वितंडवाद करणार? अशा टोकाच्या भूमिकेमुळे समाज दूर फेकला जाईल. हे आमच्या पुढच्या पिढीला अजिबात परवडणारे नाही. आम्हाला राष्ट्र म्हणून जगायचे आहे की समाज म्हणून हे एकदाचे कधीतरी ठरवावेच लागेल. मला वाटते आताची ही वेळ त्यासाठी अतिशय योग्य आहे, याकडेही डॉ. लिंबाळे यांनी लक्ष वेधले.

पुढच्या पिढीकडे  कुठला विचार सोपवताय?

एखाद्या हॉटेलात सरस्वतीची मूर्ती आहे म्हणून कुणी जेवण नाकारणार का? नोकरी करीत असलेल्या इमारतीचे नाव ‘सरस्वती भवन’ आहे म्हणून कुणी राजीनामा देणार का? नाही ना? माझीही तीच भूमिका आहे. त्यामुळे उद्या मी सरस्वती पूजन हा ज्यांचा ‘कुळाचार’ आहे त्या विदर्भ साहित्य संघाचा सत्कार स्वीकारणार आहे. प्रतिकांवरून कुठल्या माणसाची वा संस्थेची ओळख पडताळून पाहिली जाऊ नये. आम्ही आज आहोत, उद्या नाहीत. परंतु, जाताना पुढच्या पिढीच्या हाती आम्ही कुठले वैचारिक संस्कार सोपवून जातो, हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे.  अशा शब्दात डॉ. लिंबाळे यांनी विदर्भ साहित्य संघात याआधी ‘सरस्वती’च्या प्रतिमेवरून उद्भलेल्या वादावर अप्रत्यक्ष भाष्य केले.