चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्पात सफारीचे पर्यटन नोंदणीसाठी नवे अधिकृत संकेतस्थळ www.mytadoba.mahaforest.gov.in येत्या २३ सप्टेंबर पासून पर्यटकांसाठी सुरू होत आहे अशी माहिती मुख्य वनसंरक्षक तथा ताडोबाचे क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.ताडोबा कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पासह मेळघाट, नवेगांव-नागझीरा,पेंच, सह्यांद्री या प्रमुख व्याघ्र प्रकल्पासह राज्यातील इतरही अभयारण्याची ऑनलाईन बुकींग या संकेतस्थळावरून करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

ताडोबा पर्यटनाच्या ऑनलाईन नोंदणीमध्ये चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या कंपनीने ताडोबा फाऊंडेशनची १२ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केल्यानंतर बुकींगसाठी ही नविन अधिकृत संकेतस्थळ तयार केले गेले आहे. ताडोबा व्यवस्थापनाने यापूर्वीचे www.mytadoba.org https://booking.mytadoba.org हे संकेतस्थळ तत्काळ बंद केले. त्यामुळे आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनासाठी एकमेव अधिकृत संकेतस्थळ www.mytadoba.mahaforest.gov. in शनिवार २३ सप्टेंबर पासून पर्यटकांच्या सेवेत दाखल होत आहे. या संकेतस्थळावरच बुकींग करावे असे आवाहन डॉ.रामगावकर यांनी केले आहे. या संकेतस्थळाची चाचणी यशस्वी झाली आहे. तेव्हा राज्यातील व्याघ्रप्रेमी पर्यटकांनी या संकेतस्थळाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Story img Loader