‘एनएसयूआय’चा गंभीर आरोप; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंमध्ये समन्वयाचा प्रचंड अभाव आहे. विद्यापीठाच्या महाविद्यालय शाखेमध्ये मोठा गैरव्यवहार सुरू आहे. अनेक बोगस महाविद्यालयांना विद्यापीठ परवानगी देत असून विद्यार्थ्यांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क हिरावला जात आहे. कुलगुरूंना तक्रार केली तर ते प्र-कुलगुरूंकडे बोट दाखवतात. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया बंद करून विद्यापीठाने महाविद्यालयांना भ्रष्टाचाराचा मार्ग मोकळा करून दिला आहे. तक्रार केल्यास कुलगुरू म्हणतात, पुरावे द्या. विद्यार्थी संघटनांनी पुरावे गोळा करायचे असतील तर विद्यापीठ प्रशासन आणि समित्यांचे काम काय? असा सवाल उपस्थित करीत सध्या विद्यापीठ हे महाविद्यालयांच्या हातचे बाहुले झाल्याचा गंभीर आरोप नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआयने केला आहे.

‘एनएसयूआय’चे जिल्हाध्यक्ष आशीष मंडपे व जिल्हा महासचिव अनिरुद्ध पांडे यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठ आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा केली.

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यार्थी संवाद हा नवीन कार्यक्रम सुरू केला. यामध्ये संघटनांशी बोलून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातात. कुलगुरूंच्या या संकल्पनेचा आम्ही आनंदाने स्वीकार केला. मात्र, लवकरच हा केवळ एक दिखावा असल्याचा वाईट अनुभव आला. विद्यार्थी संवाद कार्यक्रमात केवळ समस्या ऐकून घेतल्या जातात. मात्र, त्यावर कुठलाही तोडगा काढला जात नाही. विद्यार्थ्यांच्या समस्या कायम राहतात, असा आरोप आशीष मंडपे यांनी केला. विद्यापीठाने यंदा पदव्युत्तर प्रवेशाची केंद्रीय पद्धत बंद करून महाविद्यालयांना  विद्यार्थ्यांकडून पैसे लुटण्यासाठी मार्ग खुला करून दिल्याचा आरोपही मंडपे यांनी केला. विद्यापीठाच्या प्रवेशावर नियंत्रण असणे आवश्यक असतानाही कुलगुरूंनी यंदा प्रवेशाची केंद्रीय पद्धतच बंद केली. यावर विचारणा केली असता विद्यापीठ कायद्यात तशी तरतूद नसल्यामुळे आम्ही हे करू शकत नसल्याचे सांगण्यात आले. विद्यापीठ अन्य बाबींसाठी अनेकदा अधिसूचना काढते. तशी सोय या प्रवेशासाठीही करता आली असती. मात्र, हल्ली विद्यापीठ विद्यार्थ्यांपेक्षा महाविद्यालयांचाच अधिक विचार करते. 

अनिरुद्ध पांडे यांनी सांगितले की, विनाअनुदातील अभ्यासक्रमासाठी यंदा महाविद्यालयांनी ठराविक शुल्कापेक्षाही चार पट पैसे विद्यार्थ्यांकडून वसूल केले. आमच्याकडे यासंदर्भात तक्रार आणि पुरावेही आहेत. हे सगळे कुलगुरूंना दाखवूनही आम्ही काहीही कारवाई करू शकत नाही, असे कुलगुरू सांगतात. त्यामुळे विद्यापीठच जर विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे नसेल तर दाद कुठे मागावी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मग, इतर संघटना ‘वसुलीदार’ आहेत का?

विद्यार्थी संसदेचे आयोजन  वादग्रस्त होते. यासाठी आधी अनुपम खेर यांना निमंत्रण देण्यात आले होते. एका कट्टरपंथीय विचाराच्या व्यक्तीला आमंत्रित करून विद्यापीठ काय साध्य करू पाहते, असा सवाल आशीष मंडपे यांनी केला. शिवाय विद्यार्थी संसदेसाठी एकाच संघटनेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. यावर विद्यार्थी कल्याणचे संचालक सांगतात की, अभाविचे कार्यकर्ते हे समाजसेवी असल्याने त्यांना सहभागी करून घेतले. मग इतर संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे काय यांना वसुलीदार वाटतात का, असा सवालही  मंडपे यांनी केला. महाविद्यालय शाखा भ्रष्टाचाराचे केंद्र नागपूर विद्यापीठाशी आज जवळपास सहाशे महाविद्यालये संलग्नित आहेत. मात्र, यातील शंभरहून अधिक महाविद्यालये बोगस आहेत. एका खोलीत ही महाविद्यालये सुरू असून प्राचार्य, प्राध्यापक, शिपाई, लिपिक या साऱ्याच पदावर एकच व्यक्ती आहे. यासंदर्भात आम्ही अनेकदा विद्यापीठाकडे तक्रारीही केल्या. मात्र, असे असतानाही महाविद्यालय शाखा, विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समित्या काहीही तपास करीत नाही. केवळ महाविद्यालयांकडून आर्थिक देवाण-घेवाण करून गुणवत्तेशी कुठलाही संबंध नसणारी महाविद्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत. विद्यापीठाची महाविद्यालय शाखा हे भ्रष्टाचाराचे केंद्र झाल्याचा आरोपही यावेळी मंडपे यांनी केला.