वर्धा : राष्ट्रीय पातळीवर विविध परीक्षा घेतल्या जात असतात. जेईई व तत्सम स्वरूपाच्या या परीक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य घडवितात. त्याचे प्रवेशपत्र, वेळापत्रक याची माहिती लवकर मिळावी म्हणून विद्यार्थी उत्सुक असतो. मात्र अनेकदा सर्व्हर डाउन असणे किंवा अन्य अडचणी उद्भवतात. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडतात. कधी कधी अफवा पण पसरतात. त्याचे निरसन करणे कठीण होऊन बसते. यावर उपाय आवश्यक असल्याचे म्हटल्याचे जात असे.

‘असा’ आहे निर्णय

देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा निर्णय घेणाऱ्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) घेते.आता काळाची पावले ओळखून एक क्रांतिकारक निर्णय या राष्ट्रीय चाचणी कक्षाने घेतला. इंजिनिअरिंगसाठीची JEE, वैद्यकीय प्रवेशासाठीची NEET आणि विद्यापीठ प्रवेशासाठीची CUET अशा अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांचे आयोजन करणाऱ्या NTA ने आता अधिकृतपणे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र (Admit Card), निकालाची तारीख आणि महत्त्वाच्या सूचना थेट फेसबुक आणि इंस्टाग्रामवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांशी थेट संवाद

या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न होणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही अपडेटसाठी NTA च्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) वारंवार जाऊन चेक करावे लागत असे. अनेकदा सर्व्हर डाऊन होणे किंवा माहिती उशिरा मिळणे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असायचे. मात्र, आजची तरुण पिढी सर्वाधिक वेळ इंस्टाग्राम आणि फेसबुकवर घालवते, हे लक्षात घेऊन NTA ने या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे माहिती अधिक वेगाने आणि थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.

अफवांना लगाम बसणार

सोशल मीडियावर परीक्षांबाबत अनेकदा चुकीच्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जातात. तारखांबाबतचे बनावट स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. आता NTA स्वतः या प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे विद्यार्थ्यांना अधिकृत आणि खात्रीशीर माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

डिजिटल इंडियाकडे वाटचाल

‘फेक न्यूज’ला आळा घालण्यासाठी हे एक प्रभावी पाऊल मानले जात आहे.डिजिटल इंडियाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असे या अनुषंगाने प्रतिक्रिया आहे. NTA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की “माहितीचा प्रसार अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा आधार घेत आहोत. यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे, तर पालक आणि शिक्षकांनाही वेळेवर अपडेट्स मिळतील.” इंस्टाग्रामवर ‘रील्स’ किंवा ‘स्टोरी’च्या माध्यमातून छोट्या आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या जातील, तर फेसबुकवर सविस्तर परिपत्रके प्रसिद्ध केली जातील.NTA च्या या निर्णयाचे विद्यार्थी वर्गातून स्वागत होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत हँडल्सनाच फॉलो करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेच्या तणावाखाली असताना माहिती मिळवण्यासाठी आता वेबसाइटवर जाण्याची गरज उरणार नाही.

सोशल मीडिया पुरेसा

विद्यार्थ्यांना फीडमध्येच आवश्यक ती माहिती मिळेल. एकूणच, तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्याचा NTA चा हा प्रयत्न कौतुकास्पद म्हटल्या जातो.यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्यांना मानसिक दिलासा मिळणार आहे. आता परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच NTA च्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा शिक्षण वर्तुळतून व्यक्त होते.