नागपूर : देशातील वाघांची संख्या वाढून भारतात जगातील सुमारे ७५ टक्के वाघ असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. मात्र, राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नवीन अहवालाने व्याघ्रसंवर्धनातील गंभीर वास्तव समोर आणले. देशातील ५८ व्याघ्रप्रकल्पांपैकी तब्बल ३८ प्रकल्पांमध्ये भक्ष्य प्राण्यांची संख्या घटली आहे, अधिवासाचा दर्जा खालावला आहे. याशिवाय नऊ व्याघ्रप्रकल्पांपैकी काहींमध्ये वाघच नाहीत, तर काहींमध्ये संख्या अत्यंत कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
२०२२च्या गणनेवर आधारित अहवाल
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ‘रोडमॅप फॉर ॲक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ टायगर्स इन इंडिया’ या अहवालातील विश्लेषण २०२२ च्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेवर आधारित आहे. २०२७ मध्ये ताजी गणना जाहीर होणार आहे. या अहवालानुसार, केवळ २० व्याघ्रप्रकल्पांमध्ये दर्जेदार अधिवास आणि पुरेसा भक्ष्यसाठा या दोन्ही बाबी समाधानकारक आहे. त्याठिकाणी वाघांची संख्या स्थिर आणि वाढती आहे. उर्वरित बहुतांश प्रकल्पांमध्ये भक्ष्यसाखळी, अधिवास किंवा दोन्ही बाबतीत गंभीर उणिवा आहेत. विशेष म्हणजे ५८ पैकी ३६ व्याघ्रप्रकल्पांमध्ये भक्ष्य प्राण्यांची कमतरता ही प्रमुख समस्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भविष्यातील गरज
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड, बिहार, आसाम आणि सुंदरबन या भागांत व्याघ्रसंवर्धनाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. मात्र उर्वरित अनेक व्याघ्रप्रकल्पांमध्ये आक्रमक वनस्पती हटविणे, अधिवास सुधारणा, तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढविणे आणि संरक्षण यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे. तसेच व्याघ्र मार्गिकांची (कॉरिडॉर) ओळख करून त्यांचे संवर्धन करणे ही भविष्यातील मोठी गरज असल्याचे यात अभ्यासकांनी नोंदवले आहे.
नऊ व्याघ्रप्रकल्पांतील परिस्थिती चिंताजनक
२०२२च्या व्याघ्रगणनेत मिझोराममधील दाम्पा, तेलंगणातील कावल, ओडिशातील सातकोसिया, महाराष्ट्रातील सह्याद्री आणि अरुणाचल प्रदेशातील कमलांग या व्याघ्रप्रकल्पांमध्ये निवासी वाघांची नोंदच झालेली नाही. झारखंडमधील पलामू आणि पश्चिम बंगालमधील बक्सा येथे केवळ एक किंवा त्याहून कमी वाघ आढळले आहेत. बक्सामध्ये छायाचित्रित झालेला वाघ भूतानमधून आलेला असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याशिवाय छत्तीसगडमधील इंद्रावती, उदंती-सीतानदी आणि गुरु घासीदास-तमोर पिंगला या व्याघ्रप्रकल्पांमध्येही वाघांची संख्या अत्यंत कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
१,३४४ वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर
देशातील अंदाजे ३,६८२ वाघांपैकी २,३३८ वाघ व्याघ्रप्रकल्पांमध्ये असून १,३४४ वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर आहेत. त्यामुळे हे वाघ मानवी हस्तक्षेप, अधिवास नष्ट होणे आणि शिकारीच्या धोक्याला अधिक सामोरे जात असल्याचे अहवालात नमूद आहे. तसेच देशातील १,३१८ वाघ केवळ दहा व्याघ्रप्रकल्पांमध्ये केंद्रित असल्याने इतर अनेक प्रकल्पांतील परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येते.
