एखादा समाज किंवा प्रवर्ग जेव्हा गाढ झोपेत जातो तेव्हा सर्वात निर्धास्त होते ते सरकार. मग ते कोणत्याही पक्षाचे असो. काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा त्यांचा सर्वाधिक वेळ मागास जाती, जमाती व अल्पसंख्यकांच्या हितांची काळजी घेण्यात गेला. या अनुनयामुळे स्वातंत्र्य काळापासून जुळलेला बहुजन म्हणजेच ओबीसींचा वर्ग दूर जातोय हे या पक्षाच्या लक्षात आले नाही. अर्थात सत्तेत असेपर्यंत. आता ती गेल्यावर राहुल गांधी ओबीसींच्या नावाने गळे काढतात. माफी मागतात. त्याचा या प्रवर्गावर अजूनतरी फारसा परिणाम झालेला नाही. दुसरीकडे भाजपला जवळ करणारा हा वर्ग अजूनही या पक्षाच्या प्रेमात असल्याचे वारंवार दिसून येते. आता हा वर्ग आपल्याला सोडून इतरत्र कुठेही सरकणारा नाही याची जणू खात्रीच या पक्षाला पटलेली. त्यामुळे भाजपला सुद्धा या वर्गाकडे दुर्लक्ष करण्याची सवय जडू लागलेली. दोन्ही प्रमुख पक्षांकडून होणारी ही अवहेलना दिसत असूनही कसलीही हालचाल न करणारा हा प्रवर्ग झोपेत असल्याचे सिद्ध करतो. हे सारे नमूद करण्याचे कारण सध्या चर्चेत असलेला क्रिमिलेअर मर्यादावाढीचा मुद्दा. ओबीसींच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने ही मर्यादा १५ लाखापर्यंत वाढवण्याची शिफारस केंद्राकडे केली. हे वाचून सजग असलेल्या कोणत्याही ओबीसीच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. यामागचे कारणही तसेच. याच महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याआधी ११ ऑक्टोबर २०२४ ला मंत्रिमंडळात ठराव करून अशीच शिफारस केंद्राकडे केली. याचा आधार घेत प्रचार करण्यात आला. नेत्यांच्या मोठ्या जाहिराती सर्वत्र झळकल्या. केंद्राने निर्णय घेतला नसताना मर्यादा वाढणार असा मजकूर त्यात टाकण्यात आला. एकूणच वातावरण असे तयार केले गेले की मर्यादा वाढली. त्याचा दणदणीत फायदा महायुतीला झाला.

आता या पहिल्या शिफारशीला केंद्राकडे जाऊन १८ महिने लोटले. मर्यादा वाढलीच नाही. केंद्राने हा निर्णय लवकर घ्यावा म्हणून महायुतीचे कर्तेधर्ते एकदाही दिल्लीला गेले नाहीत. साखर, ऊस व कांद्याच्या प्रश्नावर कमालीची संवेदनशीलता दाखवणाऱ्या या नेत्यांना या मुद्यावर ती दाखवावी असे वाटले नाही. हे नाकर्तेपण झाकण्यासाठी आता उपसमितीला पुढे करण्यात आले काय? मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या या उपसमितीच्या आजवर तीन बैठका झाल्या. पहिल्या बैठकीच्या वेळी विविध संघटनांनी एकूण १४ मागण्या समोर ठेवल्या. त्यातल्या एकाचीही पूर्तता या मंत्रीगटाला करता आली नाही. एकीकडे कोणताही निर्णय घ्यायचा नाही व दुसरीकडे केंद्राकडे शिफारस करून मोकळे व्हायचे हा वेळकाढूपणा झाला. मग या उपसमितीला अर्थ काय? मधल्या काळात राज्यसरकारने एक आदेश काढून किमान राज्यात तरी ओबीसींना उत्पन्न मर्यादेची अट लागू होणार नाही असे जाहीर केले. त्याचा फायदा ओबीसींना झाला हे मान्य पण केंद्रीय पातळीवरील शिक्षण व नोकरी मिळवताना होणाऱ्या त्रासाचे काय? तिथे प्रत्येक ठिकाणी ही मर्यादा आड येते. परिणामी २७ टक्के आरक्षण असूनसुद्धा केंद्रस्तरावरील अनेक पदे रिक्त राहतात. मर्यादा न वाढल्यामुळे आठ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गाचा आधार घ्यावा लागतो. मग आरक्षणाला अर्थ काय? मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर ओबीसी व भटके विमुक्त जमातींसाठी ही क्रिमिलेअरची अट लागू करण्यात आली. उद्देश हाच की प्रवर्गातील उन्नत व आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनी आरक्षणाचा फायदा घेऊ नये. परिस्थितीनुसार यात बदल करता यावा म्हणून त्यात दर तीन वर्षांनी वाढ करण्याचे ठरले. यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. एक लाखापासून सुरू झालेली ही मर्यादा २०१७ पर्यंत ८ लाखावर आली. नियमाप्रमाणे ती २०२० मध्ये वाढणे अपेक्षित होते. आता सहा वर्षे झाली तरी केंद्रसरकार त्यावर चुप्पी साधून आहे. सुदैवाने केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे म्हणजे भाजपचे सरकार आहे. ‘डबल इंजिन’चे सरकार असले की विकास जलदगतीने होतो. प्रश्न तातडीने मार्गी लागतात हा भाजपकडून नेहमी केला जाणारा दावा. तो याबाबतीत फोल ठरला त्याचे काय? या अपयशाची जबाबदारी नेमकी कुणाची? कधी मंत्रिमंडळ तर कधी उपसमितीला समोर करून लढणे विसरलेल्या व झोपेत असलेल्या ओबीसींना केवळ स्वप्न दाखवून गोंजारत राहायचे हा मूर्ख बनवण्याचा प्रकार नाही का? मंडल आयोगाचा आधार घेत ओबीसींमधील एक मोठा वर्ग शिक्षण घेऊ शकला, शासकीय नोकरीत स्थिरावला. त्यालाही आता ३४ वर्षे झाली. या काळात जे नोकरीत आले त्यांचे वेतन कैकपटींनी वाढले. एकीकडे असे उत्पन्न वाढत असताना त्याच पटीने क्रिमिलेअरची मर्यादा वाढणे गरजेचे होते. नेमके तेच झालेले नाही.

आजच्या घडीला वर्ग तीन व चारमधील कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन आठ लाखापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यांच्या मुलांना क्रिमिलेअरचा लाभच मिळत नाही. केंद्रीय पातळीवरील नोकऱ्यांमध्ये या वर्गाचा सहभाग शून्यावर येऊन ठेपला आहे. या पाल्यांनी केवळ कारकून, शिक्षकच व्हावे असे सरकारला वाटते काय? मिळालेल्या आरक्षण संधीचा लाभ घेत वरच्या पदावर जावे अशी स्वप्ने यांनी बघू नये अशी सरकारची इच्छा आहे का? मर्यादावाढीकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्रसरकारने ८ मार्च २०१९ ला बी.पी. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली. उत्पन्नमर्यादा किती वाढवायला हवी याचे उत्तर शोधण्यासाठी. समितीने १२ लाखाच्या मर्यादेत वेतन व शेतीपासून मिळणारे उत्पन्न गृहीत धरावे अशी शिफारस केली. त्यावर देशभरातील ओबीसींनी आक्षेप घेतला. मग सरकारने ही समितीच रद्द केली. यानंतर तातडीने नव्या समितीचे गठन होणे गरजेचे होते. ते आजतागायत झालेले नाही. का याचे उत्तर ना केंद्राकडून मिळाले, ना राज्याकडून. आम्ही ओबीसींचे पाठीराखे आहोत. केंद्रात २७ ओबीसी मंत्री आहेत. इतकेच काय देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत असा दावा वारंवार केला जातो. शिक्षण व नोकरीसाठी झगडणाऱ्या ओबीसींनी यातच समाधान मानून घ्यावे असे भाजपला वाटते काय? ढीगभर मंत्री असतीलही पण त्याचा सामान्यांना फायदा काय? दरवर्षी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली की क्रिमिलेअरच्या मुद्यावरून प्रत्येक ओबीसी पालकाच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. भरपूर शुल्क असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे पाल्याचा कल असेल तर ही भीती आणखी तीव्र होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना याच मर्यादेचा सामना करावा लागतो. अलीकडे तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कोणते उत्पन्न गृहीत धरावे यावर स्पष्ट निर्णय दिला. तरीही क्रिमिलेअरचे भिजत घोंगडे तसेच ठेवण्यात केंद्र व राज्य सरकार धन्यता मानते. सरकारसाठी सुदैवाची बाब हीच की हा प्रवर्ग अन्यायाने पेटून उठावे ही ईर्षाच विसरून गेलाय.