नागपूर : स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिल्याशिवाय मागासवर्गीय विद्यार्थी स्पर्धेत टिकू शकणार नाही. मात्र, इतर मागासवर्गीय (ओबीसी) खाते त्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. निव्वळ पदवी किंवा तत्सम शिक्षण घेऊन उपयोग नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी ही काळाची गरज आहे. ही तयारी करण्यासाठी मागासवर्गीय युवकांसाठी काहीच व्यवस्था नाही. त्यादृष्टीने ओबीसी खात्याने पावले उचलणे अपेक्षित होते. परंतु त्यासंदर्भात हे खाते कायमच उदासीन राहिले आहे. त्याउलट सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने तत्परता दाखवून अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दिलासा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत बँक (आयबीपीएस), रेल्वे, एलआयसी व तत्सम स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, पोलीस व लष्कर भरतीचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर देण्याचे त्यांचे नियोजन आहे. दुसरीकडे ओबीसी खाते याबाबत ढिम्म आहे. ‘महाज्योती’ने नीट आणि जेईईचे प्रशिक्षण ऑनलाइन देऊन बट्टय़ाबोळ केला. तसेच एमपीएससी आणि यूपीएससीचेदेखील प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निवडण्यात, वेळेत अनेक उणिवा आहेत. परंतु ओबीसी खाते याबाबत अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येते.

शासकीय नोकरीत लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींचा टक्का कमी आहे. तरीही बार्टीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याची कोणतीच योजना ओबीसी खाते किंवा ‘महाज्योती’कडे असू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बार्टीने राज्यात ३० प्रशिक्षण केंद्रांवर बँक, रेल्वे, एलआयसी व तत्सम स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसेच पोलीस व लष्कर भरतीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र उपलब्ध नाहीत त्यासाठी निविदा काढून नवीन केंद्र सुरू करण्याचा आणि ज्या जिल्ह्यात एकापेक्षा अधिक केंद्राची आवश्यकता असल्यास तेथे ते सुरू करण्याचा निर्णयदेखील बार्टीने घेतला आहे.

बार्टीच्या धर्तीवर ओबीसी खाते किंवा ‘महाज्योती’ने सर्व जिल्ह्यांत आवश्यक त्या प्रमाणात तातडीने केंद्र सुरू करणे गरजेचे आहे.

– सचिन राजुरकर, सचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ