नागपूर : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या केंद्रीयीकृत प्रवेश प्रक्रियेतील (कॅप) फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर संस्थास्तरावर प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या शुद्धिपत्रकात अशा विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्याची स्पष्ट तरतूद असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र या विद्यार्थ्यांना लाभ मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १८ जून २०२५ रोजी काढलेल्या शुद्धिपत्रकाद्वारे राज्यातील विविध विभागांच्या शिष्यवृत्ती योजनांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ‘कॅप’च्या कोणत्याही फेरीत जागा वाटप झालेले विद्यार्थी तसेच ‘कॅप’ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीच्या मान्यतेने संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही संबंधित योजनेचा लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यात इतर मागासवर्गीय प्रवर्गाचाही समावेश आहे. मात्र, या तरतुदीची ओबीसी विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, अशा तक्रारी आहेत. दुसरीकडे अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यांसह मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संस्थास्तरावरील प्रवेशानंतरही शिष्यवृत्ती अथवा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे एकाच प्रवेश प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वेगवेगळे निकष का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासनाच्या शुद्धिपत्रकात संस्थास्तरावरील प्रवेशाबाबत स्पष्ट तरतूद असताना त्याची अंमलबजावणी ओबीसी विद्यार्थ्यांच्या बाबतीत का होत नाही, याबाबत संबंधित विभागाने स्पष्टता करावी, अशी मागणी होत आहे. महाडीबीटी प्रणालीतील तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी दूर करून पात्र ओबीसी विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती आणि शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ द्यावा, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून होत आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांना कुठल्याही योजनेचा लाभ देताना कायमच अन्याय केला जातो. इतर सर्व प्रवर्गांना योजनेचा लाभ दिला जात असताना ओबीसी विद्यार्थ्यांनाही तो मिळणे आवश्यक आहे. शासन निर्णयात तशी स्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन ओबीसी विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ द्यावा.- सचिन राजूरकर, सरचिटणीस, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

या विषयासंदर्भात संबंधित विभागाला विचारणा करून तात्काळ ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषयावर तोडगा काढला जाईल.- अतुल सावे, मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण.