नागपूर : लठ्ठपणा आणि मधुमेह या केवळ स्वतंत्र आरोग्य समस्या नसून त्यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. लठ्ठपणामुळे मधुमेहासह हृदयविकार, उच्च रक्तदाब, यकृताचे विकार आणि झोपेशी संबंधित समस्या वाढू शकतात. तर मधुमेहामुळे पायांच्या नसांवर आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन जखम, संसर्ग आणि गंभीर परिस्थितीत पाय गमावण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणासोबत वजन नियंत्रण, आहार, व्यायाम, झोप आणि नियमित तपासणी यांचा एकत्रित विचार करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मधुमेह आणि लठ्ठपणाकडे एकत्रितपणे पाहण्याची गरज का?

आनुवंशिकता, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप आणि ताणतणाव यांसह विविध कारणांमुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे केवळ रक्तातील साखर कमी करणे किंवा वजन घटविणे पुरेसे नसून रुग्णाच्या संपूर्ण आरोग्याचा विचार करून उपचार करण्याची गरज आहे.

डायबेटिक फूटपासून बचाव कसा करावा?

मधुमेह असलेल्या रुग्णांनी पायांची नियमित तपासणी करणे, जखम किंवा संसर्गाची लक्षणे वेळीच ओळखणे आणि उपचारास विलंब न करणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.

उपचारात रुग्णाचा सहभाग का महत्त्वाचा?

आहारातील बदल, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, औषधोपचार, ताणतणाव आणि झोपेचे व्यवस्थापन याबरोबरच रुग्णाला आजाराची माहिती असणे आवश्यक आहे. हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि नसांचे संरक्षण करण्यासाठी नियमित तपासणीही महत्त्वाची आहे, असे डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

तज्ज्ञांची राष्ट्रीय परिषद कधी?

‘दोस्तीकॉन २०२६’ ही राष्ट्रीय लठ्ठपणा परिषद २२ आणि २३ ऑगस्टला हॉटेल रीजेंटा सेंट्रल, जगनाडे चौक, नागपूर येथे होणार आहे. ‘गुडबाय डायबेसिटी, गुडबाय डायबेटिक फूट’ ही परिषदेची संकल्पना आहे. डायबिटीज ओबेसिटी सोसायटी ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्हच्या वतीने आयोजित परिषदेला इंडियन मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, इंडियन पोडियाट्री असोसिएशन, अजमेरू डायबिटीज सोसायटी, डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया आणि इंटरनॅशनल डायबिटीज एक्सपर्ट्स कन्सोर्टियम, पुणे यांचे सहकार्य आहे. डॉ. अजय कडूसकर, डॉ. अभिषेक पांडे आणि डॉ. केदार देशपांडे हे आयोजन समितीत असून डॉ. राजेश देशमुख अध्यक्ष आहेत. देशभरातील तज्ज्ञ परिषदेत सहभागी होणार आहेत.