scorecardresearch

कोळशाचा दर्जा तपासणाऱ्या खासगी कंपनीवर आक्षेप !

सध्या महानिर्मितीला वेकोलि, एमसीएल, एसईसीएल या कोल कंपन्यांकडून कोळसा उपलब्ध होतो.

कंपनीकडे कामाचा अनुभवच नाही?

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : महानिर्मितीला धुतलेला कोळसा पुरवण्यासाठी महाराष्ट्र खनिकर्म महामंडळाने (एमएसएमसी) चार वेगवेगळय़ा खासगी कंपन्यांना कंत्राट दिले. याचवेळी खाणीतून प्रकल्पापर्यंत जाणाऱ्या कोळशावर नियंत्रण व दर्जा तपासणीचे काम एका खासगी कंपनीला दिले गेले. परंतु, या कंपनीला या कामाचा अनुभव नसतानाही कोटय़वधींचे काम कसे दिले, असा प्रश्न उपस्थित करत ‘जय जवान जय किसान’ संघटनेने यावर आक्षेप घेतला आहे.

सध्या महानिर्मितीला वेकोलि, एमसीएल, एसईसीएल या कोल कंपन्यांकडून कोळसा उपलब्ध होतो. या कंपन्यांच्या खाणीतून निघालेला कोळसा खनिकर्म महामंडळाने कंत्राट दिलेल्या खासगी कंपनीच्या वॉशरीजमध्ये धुतल्यावर तो महानिर्मितीकडे येतो. दरम्यान, खनिकर्म मंडळाने कोल वॉशरीजचे कंत्राट देताना महानिर्मितीला पुरवणाऱ्या कोळशाचा दर्जा तपासणी आणि निरीक्षणाचे कंत्राट ‘एक्सवायनो कॅपीटल सव्‍‌र्हिस प्रा. लि.’ या कंपनीला दिले. हे काम ईओआय या प्रक्रियेने दिले गेले. या प्रक्रियेदरम्यान सहा कंपन्यांनी हे काम करण्याची तयारी दर्शवली. त्यात या कामाचा अनुभव असलेल्या ५ कंपन्यांचाही समावेश होता. परंतु, विविध निकषांवर बोट ठेवून अनुभव असलेल्या कंपन्यांना अपात्र ठरवत ‘एक्सवायनो कॅपीटल सव्‍‌र्हिस प्रा. लि.’ या कंपनीला हे काम देण्यात आले. खाणीतून निघणाऱ्या कोळशावर नजर ठेवणे, त्याचा दर्जा तपासणे, नाकारलेल्या कोळशासह इतर कोळसा वेगवेगळा ठेवणे, वेकोलि, कोल कंपन्यांसह महानिर्मितीसोबत बैठक घेत कोळसा पुरवठय़ात अडचण येऊ नये म्हणून काळजी घेणे, कोळशाच्या सुरळीत वाहतुकीसाठी रेल्वेसह रस्ते वाहतूकदारांशी समन्वय साधून खाणीपासून प्रकल्पापर्यंत सुरक्षित कोळसा पाठवण्याची जबाबदारी असते. त्याबदल्यात कोल वॉशरीजला देण्यासाठी महानिर्मितीकडून खनिकर्म महामंडळाला मिळणाऱ्या रकमेतील प्रति मेट्रिक टन साडेबावीस रुपयांची कपात केली जाते. खनिकर्मच्या रकमेतून दहा टक्के कपात करून इतर रक्कम या मॉनिटरींग एजंसीला दिली जाते. परंतु, कंत्राट देतेवेळी सदर कंपनीला या कामाचा अनुभवच नव्हता. शिवाय, कंपनीकडे कोळशाचा दर्जा तपासण्याची प्रयोगशाळाही नाही. त्यामुळे या कंपनीला कोणत्या निकषांवर हे काम दिले गेले, प्रति टन साडेबावीस रुपये हा दर कसा निश्चित झाला, असे प्रश्न जय जवान जय किसान संघटनेकडून उपस्थित केले जात आहेत.

महिन्याला २.५ कोटी टन कोळशाचा पुरवठा 

वेकोलिच्या खाणीतून निघणारा कोळसा सध्या हिंद महामिनरल, रुक्मिणी, एसीबी या तीन कंपन्यांच्या वॉशरीजमध्ये धुण्यासाठी येतो.  एसईसीएलच्या खाणीतील कोळसा दुसऱ्या खाणीत जातो. महानिर्मिताला महिन्याला २.५ कोटी टन कोळशाचा पुरवठा होतो. वर्षांला हा पुरवठा ३० कोटी टनांच्या जवळपास आहे.

सखोल चौकशीची गरज

खनिकर्मकडून २०१९ च्या दरम्यान कोळशाचा दर्जा तपासण्याची ईओआय ही निविदासदृश प्रक्रिया राबवली गेली. त्यानंतर एक्सवायनो या कंपनीला हे काम दिले गेले. या कंपनीने २०२० मध्ये तयार झालेल्या प्रिमस सॅम प्रा. लि. या कंपनीलाही या कामासाठी सोबत घेतले. या पद्धतीवरही जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी आक्षेप घेत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

सर्व कामे नियमानुसार

खनिकर्म महामंडळाने शासन व महानिर्मितीकडून मिळालेल्या सूचनेनुसार पारदर्शी निविदा प्रक्रिया राबवली. त्यानंतर अनुभव असलेल्या कंपनीलाच काम दिले गेले. खाणीतून कोळसा निघण्यापासून तो महानिर्मिती प्रकल्पात जाईपर्यंत त्यावर निरीक्षणाची जबाबदारी या कंपनीवर आहे. निविदेतील अटीनुसार या कंपनीने दुसऱ्या कंपनीलाही सोबत घेणे गैर नाही. कंपनीला कोळशाचे नमुने तपासावे लागत नसल्याने त्यांना प्रयोगशाळेची गरजच नाही.

पी.वाय. टेंभरे, महाव्यवस्थापक, राज्य खनिकर्म महामंडळ लि., नागपूर.

महानिर्मितीही दर्जा तपासते

ही निविदा प्रक्रिया राज्य खनिकर्म महामंडळामार्फत पूर्ण झाली असून त्यात महानिर्मितीचा हस्तक्षेप नसतो. परंतु महानिर्मितीकडे कोळसा आल्यावर कंपनी वेगवेगळय़ा पद्धतीने त्याचा दर्जा तपासते. त्यासाठी वेळोवेळी कोळशाचे नमुने त्रयस्थ संस्थेकडूनही तपासले जातात.

पुरुषोत्तम जाधव, संचालक (खनिकर्म), महानिर्मिती, मुंबई.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Objection raise on private company who checking coal quality zws

ताज्या बातम्या