Okha Tirupati Express regular service : अकोला : भक्तांना तिरुपतीला जाण्यासाठी आणखी एक नियमित स्वरूपात रेल्वे उपलब्ध झाली आहे. रेल्वेने ओखा आणि तिरुपती दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्या नियमित केल्या आहेत. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित म्हणून चालवल्या जातील. प्रवाशांची सोय वाढेल आणि कामकाज अधिक सुव्यवस्थित होईल.
आता गाडी क्रमांक १९६५०/१९५५९
सध्या कार्यरत असलेल्या गाडी क्रमांक ०९५२० / ०९५१९ ओखा ते तिरुपती साप्ताहिक विशेष गाड्यांचे नियमित सेवांमध्ये रूपांतर केले जाईल. गाडी क्रमांक १९५६० साप्ताहिक एक्सप्रेस ११ मेपासून दर सोमवार रोजी ओखा येथून २३.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी तिरुपती येथे २३.३० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक १९५५९ साप्ताहिक एक्सप्रेस १४ मेपासून दर गुरुवार रोजी तिरुपती येथून ०८.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ओखा येथे ११.५० वाजता पोहचेल.
‘या’ स्थानकावर थांबा
या गाडीला द्वारका, खंभालिया, जामनगर, हापा, राजकोट, वांकानेर, सुरेंद्रनगर, विरमगाम, अहमदाबाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, उधना, नंदुरबार, अमलनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत, पूर्णा, हुजूर साहिब नांदेड, बासर, निझामाबाद, कामारेड्डी, बोलारम, काचीगुडा, महबूबनगर, गदवाल, कर्नूल सिटी, डोन, ताडिपत्री, कडप्पा, राजमपेटा आणि रेनिगुंटा रेल्वेस्थानकावर थांबा राहणार आहे.
वातानुकूलितसह शयनयान श्रेणीचे डबे
विशेष गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, दोन सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे. या गाड्यांच्या सविस्तर वेळा आणि थांब्यांसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि प्रवाशांनी कृपया गाडी क्रमांकातील बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
काकीनाडा टाऊन ते हिसार विशेष गाडीही नियमित
रेल्वेने काकीनाडा टाऊन आणि हिसार दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्या देखील नियमित केल्या आहेत. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित म्हणून चालवल्या जातील. सध्या कार्यरत असलेल्या गाडी क्रमांक ०७७१७/०७७१८ काकीनाडा टाऊन ते हिसार साप्ताहिक विशेष गाड्यांचे नियमित सेवांमध्ये रूपांतर केले जाईल. गाडी क्रमांक १७२९५ साप्ताहिक एक्सप्रेस १२ मेपासून दर मंगळवारी काकीनाडा टाऊन येथून ०५.४० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी हिसार येथे १०.२० वाजता पोहचेल. गाडी क्रमांक १७२९६ साप्ताहिक एक्सप्रेस १५ मेपासून दर शुक्रवारी हिसार येथून १४.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी काकीनाडा टाऊन येथे २१.३५ वाजता पोहचेल.
