विदेशातून परतणाऱ्या प्रवाशांचा सर्वत्र वावर
महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : ओमायक्रॉनचा धोका बघता विविध जोखमीतल्या देशातून नागपुरात आलेल्या प्रवाशांना करोना चाचणी अहवालानंतरच घरी सोडले जाणार होते. परंतु सध्या विमानतळावर नमुने देऊन हे प्रवासी सर्वत्र संचार करीत आहेत. यापैकी कुणाला ओमायक्रॉनचे निदान झाल्यास इतर नागरिकांत झपाटय़ाने संक्रमण पसरण्याचा धोका आहे.
नागपुरात आजपर्यंत या विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. मध्यंतरी नागपूर महापालिकासह जिल्हा प्रशासनाने जोखमीतल्या देशातून नागपुरात परतलेल्या प्रवाशाला करोना चाचणीच्या अहवालानंतरच घरी सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते. या रुग्णासाठी आमदार निवासात व्यवस्थाही आहे. पाच डिसेंबरला शारजा येथून आलेल्या विमानातील १० ते १५ प्रवाशांना या नियमानुसार आमदार निवासात आणले गेले. चाचणी अहवालानंतरच त्यांना घरी सोडले गेले. परंतु कालांतराने महापालिकेने दुर्लक्ष केल्याने या नियमाला गुंडाळून विदेशातून आलेले प्रवासी आता विमानतळावर नमुने देऊन थेट घरी पोहचत आहेत. यातील काही तर सर्वत्र वावरत असल्याचे नागरिक सांगतात. या चाचणी अहवालाला तीन ते चार तास लागतात. त्यानंतर करोनाचे निदान झाल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संबंधिताची शोधाशोध केली जाते. हे रुग्ण सापडल्यावर त्यांना रुग्णालयात हलवले जाते. या प्रक्रियेला बरेच तास लागतात. या विलंबाच्या काळात या रुग्णापैकी कुणात ओमायक्रॉन असल्यास त्याच्या संक्रमणाची गती बघता अनेक जण या विषाणूने संक्रमित होऊ शकतात. सध्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजाहून विमाने येतात. त्यात नागपूरसह इतर भागातीलही प्रवासी असतात.
अनुभवातूनही शिकण्याची तयारी नाही
नागपुरात पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण हा देशांतर्गत विमानातून येथे आला होता. तो करोनाग्रस्त असल्याचे काही दिवसांनी कळले होते. तेव्हापर्यंत तो घरातच होता, तर दुसराही रुग्ण करोनाचे निदान होईपर्यंत घरातच होता. तो तब्बल ५२ व्यक्तींच्या संपर्कात आला. या अनुभवानंतरही कुणीही शिकायला तयार नाही. त्यामुळेच २६ डिसेंबरला शारजा येथून आलेले पाच प्रवासीही घरात काही तास थांबल्याचे पुढे आले आहे. आता या सगळय़ांच्या संपर्कातील नागरिकांपर्यंत पोहचण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.
या चाचणी अहवालाला तीन ते चार तास लागतात. त्यानंतर करोनाचे निदान झाल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संबंधिताची शोधाशोध केली जाते.
विविध यंत्रणांमध्ये समन्वय नाही
विदेशात प्रवास करून कुणी देशांतर्गत विमान सेवेने नागपुरात परतल्याची माहिती नागपूर महापालिकेकडे येण्यास बराच काळ लागतो. त्यामुळे आरोग्य विभागाला चाचणीसाठी पोहचण्यासाठी तीन ते चार दिवस लागत आहेत.
‘‘विदेश प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या प्रत्येक प्रवाशांची नागपूर विमानतळावर करोना चाचणी केली जाते. अहवाल आल्यावरच त्यांना घरी सोडले जाते. तोपर्यंत त्यांच्या थांबण्यासाठी आमदार निवासात सोय करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत विमान प्रवासाद्वारे नागपुरात आलेल्या प्रवाशांचीही चाचणी केली जाते.’’
– राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
