बुलढाणा: श्री संत गजानन महाराजांच्या ११४ व्या पुण्यतिथी निमित्त आज विदर्भ पंढरी शेगाव नगरी मध्ये विदर्भासह राज्य भरातून आलेल्या आबालवृद्ध भाविकांचा मेळा जमला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कमी अधिक ३७० दिंड्या संतनगरीत डेरे दाखल झाल्या असून संत गजानन महाराज मंदिर, परिसर आणि मंदिराकडे येणारे मार्ग भाविकांनी नुसते फुलून गेल्याचे चित्र आहे.

हजारो भाविकांची मांदियाळी, आंब्याची तोरणे, केळीची पाने आणि रंगीबेरंगी फुलांनी मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक सजावट, दर्शन बारी मध्ये सकाळ पासूनच लागलेल्या दीर्घ रांगा, संस्थान तर्फे उपलब्ध करून देण्यात सुविधा, शेकडोच्या संख्येतील सज्ज सेवेकरी, गण गण गणात बोते चा होणारा गजर, विठू माऊलीचा नाम जप , चोहोदिशानी शेगावात दाखल होणारे भाविक असा संतनगरीचा आज थाट आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा, खानदेश, विदर्भासह मध्य प्रदेशातील भजनी दिंड्या ‘ज्ञानोबा तुकाराम’चा नामघोष करीत संत नगरीत दाखल होण्यास काल शनिवारी संध्याकाळ पासूनच प्रारंभ झाला. आज सकाळी दहा वाजेपर्यंत संतनगरीत पावणे चारशे दिंड्या दाखल झाल्याचे सांगण्यात आले. या दिंड्यांची सुसज्ज व्यवस्था गजानन महाराज संस्थान मार्फत करण्यात आली आहे.

हे ही वाचा…गुलाब पुरींच्या गणपतींच्या वादग्रस्त देखाव्याबाबत उत्सुकता

यागाची सांगता ऋषीपंचमी ला श्रीं चा पुण्यतिथी सोहळा दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदा ४ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर पाच दिवस रोज श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यापूर्वी चार सप्टेंबर पासून प्रारंभ झालेल्या गणेशयाग व वरूणयागाची आज सकाळी १० वाजताच्या आसपास पुर्णाहूती व अवभृतस्नान ब्रम्हवृंद यांच्या उपस्थितीत पार पडले.दररोज सकाळी ६ ते ६.४५ काकडा, सकाळी ७.१५ ते९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ हरिपाठ रात्री ८ ते १० किर्तन असा नित्यक्रम होता. ४ सप्टेंबरला ह.भ.प. संदीप बुवा डुमरे कल्याण ,५ सप्टेंबर ह.भ.प. सुरेश बुवा वाकडे पुसद, ६ ला प्रशांत बुवा ताकोते शिरसोली, ७ सप्टेंबर ह. भ. प. भरत बुवा पाटील म्हैसवाडी, ८ सप्टेंबर बाळू बुवा गिरगावकर गिरगाव यांची कीर्तने पार पडली. आज रविवारी, ८ सप्टेंबर रोजी सकाळी, श्रींचे समाधी सोहळ्यानिमित्त

ह.भ.प. भरत बुवा पाटील म्हैसवाडीकर यांचे सकाळी कीर्तन पार पडले. कीर्तन श्रवण साठी भाविकांची मोठी गर्दी जमली. ९ सष्टेबर रोजी हभप श्रीधरबुवा आवारे खापरवाडी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन होईल . नंतर दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रम झाल्यावर पुण्यतिथी सोहळ्याची रीतसर सांगता होणार आहे. दुसरीकडे गजानन सेवा समिती व्दारे श्रींच्या ऋषिपंचमी उत्सवानिमित्त दोन दिवस महाप्रसादाचे आयोजन  करण्यात आले. अग्रसेन भवन येथे  काल शनिवार आणि आज रविवारी सष्टेबर रोजी सकाळी ६ वाजेपासून रात्रीपर्यंत अविरत महाप्रसाद वाटप सुरु राहीले. शेगाव, नागपूर, अकोटचा भक्त परिवार श्री गजानन सेवा समितीव्दारे ही सेवा देतो. दरवर्षी ऋषिपंचमी, रामनवमी, प्रगटदिन या उत्सव काळात श्रींच्या भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. यंदाही अन्नदानाची ही परंपरा समितीने कायम राखली.

हे ही वाचा…बुलढाणा: सर्वांचेच लक्ष्य संजय गायकवाड! पण चक्रव्यूहाचा भेद करणार कोण?

दर्शनासाठी एकेरी मार्ग

भक्तांच्या सोयीसाठी श्रींचे दर्शनसाठी एकेरी मार्ग करण्यात आला . दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी व पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था करण्यात आली .