अमरावती-जबलपूर रेल्वे गाडी बंद केल्याप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी येथील रेल्वेस्थानकावर हनुमान चालिसाचे पठण केले. खासदार नवनीत राणा यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिल्याची प्रतिक्रिया उमटली.
हेही वाचा >>>नागपूर : गडकरींच्या फिटनेसचे अमिताभ, जया बच्चनकडून कौतुक, म्हणाले ‘तुम्ही दहा ते पंधरा वर्षाने….




गेल्या ८ वर्षात केंद्रातील सरकारने अमरावती जिल्ह्याकरिता कोणत्याही नव्या रेल्वेची सुरुवात करण्यात आली नाही. याउलट प्रवाशांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून देखील अमरावती-जबलपूर ही रेल्वे गाडी बंद करण्यात आली. जिल्ह्यातील दोन्हीही खासदारांना, केंद्र सरकारला व रेल्वेमंत्र्याला जागे करण्यासाठी तसेच नागरिकांच्या विकासात्मक प्रश्नांवर भूमिका घेण्यासाठी सद्बुद्धी येवो यासाठी हनुमान चालिसाचे पठण करण्यात आल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ही रेल्वे गाडी सुरू न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील काँग्रेसने दिला आहे. माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, अनिल तरडेजा यांच्या नेतृत्वात केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना अमरावती स्टेशन प्रबंधकांमार्फत निवेदन देण्यात आले.
हेही वाचा >>> गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार ; बंदोबस्तासाठी आरमोरीत नागरिकांचा ठिय्या
अमरावती-जबलपूर रेल्वे बंद करण्याबाबत जून महिन्यात बैठक घेण्यात आली होती. मात्र, या बैठकीला खासदार नवनीत राणा गैरहजर होत्या. अमरावती जबलपूर गाडी ही व्यावसायिकदृष्ट्या नफ्यात चालणारी गाडी असताना नव्या गाडीसाठी प्रयत्न करण्याऐवजी आहे ती गाडी सुद्धा बंद करण्याचे पातक केंद्रातील सरकारने व दोन्ही खासदारांनी केलेले आहे. अशा निष्क्रिय व फक्त सवंग लोकप्रियता, धार्मिक धृवीकरणाच्या आधारे आपले राजकारण साधू पाहणाऱ्या या दोन्ही खासदारांची भूमिका निषेधार्ह असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.