लोकसत्‍ता टीम

अमरावती : संपूर्ण देशभरात आंतरराष्‍ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर येथे योगसाधना केली. योग दिनाच्‍या निमित्‍ताने काहीतरी जगावेगळे करावे, या उद्देशाने येथील पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी जलतरण तलावात तब्‍बल दोन मिनिटे तीस सेंकद पाण्‍याखाली योगासने केली. त्‍यांची ही अनोखी कामगिरी पाहण्‍यासाठी अमरावतीकरांनी गर्दी केली होती.

अमरावती पोलीस मुख्‍यालयात कार्यरत असलेले प्रवीण आखरे यांनी पोहण्‍यात विशेष कौशल्‍य आत्‍मसात केले आहे. पोलीस आयुक्‍तालयाअंतर्गत असलेल्‍या जलतरण केंद्राची देखभाल ते करतात. अनेक तरूणांना पोहण्‍याचे प्रशिक्षणही ते देतात. २१ जून या आंतरराष्‍ट्रीय योग दिनानिमित्‍त प्रवीण आखरे यांनी प्रथमच ११ फूट खोल पाण्‍याखाली विविध योगासनांचे प्रात्‍यक्षिके सादर केली.

आणखी वाचा-नागपूर : पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट, राज्यव्यापी चिखलफेक आंदोलन

प्रवीण आखरे यांनी या सादरीकरणासाठी वर्षभरापासून सराव केला. पाण्‍याखाली योगासने करण्‍यासाठी पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी यांनीही त्‍यांना परवानगी दिली. प्रवीण आखरे यांनी आपत्‍ती व्‍यवस्‍थापनातही योगदान दिले आहे. त्‍यांनी आजवर पाण्‍यात बुडणाऱ्या ५५ जणांना जीवदान दिले आहे. शिवाय पाण्‍यात बुडालेल्‍या ७८ जणांचे मृतदेह देखील बाहेर काढले आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासून प्रवीण आखरे हे पोहण्याचा सराव करीत आहेत.

योगासने अनेक जण करतात, मात्र पाण्‍याखाली योगासने करणे हे सहजसोपे नाही. त्‍यासाठी भरपूर सराव लागतो. विशेष कौशल्‍य लागते. प्रवीण आखरे यांनी ते आत्‍मसात करून पाण्‍यासाठी योगसाधना केली. हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्‍यातून सर्वसामान्‍य नागरिकांना देखील प्रोत्‍साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

आणखी वाचा- साहेब, पक्षातील मक्तेदारी थांबवा, अन्यथा भाजपविरोधात… देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्याचे पत्र..!

प्रवीण आखरे यांनी गेल्‍या वर्षी सप्‍टेंबरमध्‍ये सलग एक तास दोन मिनिटे पाण्‍यात उभ्‍या स्थितीत राहण्‍याचा विक्रम केला होता. आशिया बूक ऑफ रेकॉर्डने त्‍याची नोंद घेतली होता. ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी ३० मिनिटे पाण्यात उभे राहण्याचा विक्रम नोंदविण्यासाठी शहर पोलीस दलाच्या जलतरण तलावात उतरले होते. ही कामगिरी त्यांनी तीस मिनिटात पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एक तास दोन मिनिटे पाण्यात उभे राहण्याचा नवा विक्रम नोंदवला होता.

या कामगिरीबद्दल त्‍यांचे सर्वत्र कौतुक करण्‍यात आले होते. त्‍याआधी २८ मे २०२३ रोजी अमरावती शहरातील तक्षशिला महाविद्यालयाच्या जलतरण तलावात २२ मिनिटे ५२ सेकंदात पाण्यात ५० योगासने करण्याचा विक्रम त्‍यांनी नोंदवला होता. या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.