नागपूर: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात रॅली, रोड शोची स्पर्धा लागली असुून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुचाकीवर स्वार होऊन नागपूरकरांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी खूप दिवसांनी दुचाकी चालवत असल्याने असहज वाटत असल्याचे सांगितले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्र्यांना साथ दिली. आजपर्यंत नागपुरात केवळ भाजपने विकास केला असून नागपूरकर यावेळी भरघोस मतदान करून सदस्यांचा मागील विक्रम मोडित काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांनी कधीही विकास केला नसून ती जबाबदारी आमच्यावर सोपवा, असे आवाहन त्यांनी नागपूरकरांना केले.

प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गृहनगरातून दिवसाच्या प्रचाराला सुरुवात केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास भारत माता चौकातून कार्यकर्त्यांसोबत ते दुचाकीने निघाले. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष देशमुख, आमदार कृपाल तुमाने यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. प्रत्येक चौकांत प्रवेशद्वार अन त्यांच्यावर पुष्पवृष्टीने वर्षाव करीत कार्यकर्ते भाजपच्या विजयाचा जयघोष करीत होते. शहीद चौक, बडकस चौक मार्गे बाईक रॅली महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आली. येथे बाईक रॅलीचा समारोप झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले.

कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागपूकरांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. दरम्यान प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळपासून उमेदवारांची धावपळ सुरु झाली आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांनी सायंकाळनंतर छुप्या बैठकांच्या अजेंड्यावर काम करण्यासाठी कंबर कसली आहे.

महापालिकेच्या ३८ प्रभागातील १५१ नगरसेवकपदासाठी ९९३ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी ३ जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर गेल्या अकरा दिवसांपासून भाजप, काँग्रेस, बसप, शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, मनसेसह अपक्ष उमेदवारांकडून मते मागण्यासाठी सभा, रॅली, पदयात्रेवर भर देण्यात आला. आतापर्यंत सभांमध्ये भाजपने आघाडी घेतली. या काळात काँग्रेस नेते व भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्याने निवडणुकीत रंगत आली. कॉंग्रेसपाठोपाठ रविवारी भाजपनेही आपला जाहीरनामा प्रकाशित केला. भाजपसाठी प्रथमच बंडखोर डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. त्या तुलनेत काँग्रेसने बंडखोरांना शांत करीत दिलेल्या उमेदवारांच्या समर्थनात उभेही केले. बसपसाठी कुणी नेता सभेसाठी आला नसल्याने उमेदवारांंना स्वत:च घाम गाळावा लागत आहे. गेल्या दहा दिवसांत सर्वच पक्षांकडून मोहल्ला सभाही घेण्यात आल्या असून भाजप, काँग्रेससह सर्वांनीच जिंकण्याचे दावे केले आहे.

आमदार झाले धावपटू

मुख्यमंत्र्यांची रॅली अत्यंत दाट वस्तीत असल्याने पुढे त्यांचे सुरक्षारक्षक, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार गिरीश व्यास धावत होते. मुख्यमंत्र्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फौज होती. रॅलीदरम्यान भारत माता चौक ते महाल गांधी गेटपर्यंत रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

मतदारांना गाठण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा

उमेदवारांत जनसंपर्कासाठी सकाळपासून धावपळ सुरु झाली असून उद्यान, घरी जिथे मिळेल तिथे मतदारांना गाठण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा दिसून येत आहे. अनेकांनी सकाळपासूनच पदयात्रेतून प्रत्यक्ष मतदारांना भेटण्यास सुरुवात केली. प्रभागातील एक एक घरापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचा कस लागत आहे. शेवटचा दिवस असल्याने भाजपचे आघाडीचे नेतेही उमेदवारांसाठी फिरत आहेत. काँग्रेसकडूनही आमदार विकास ठाकरे, आमदार नितीन राऊत, आमदार अभिजित वंजारी प्रभागांमध्ये दिसून येणार आहे.