अकोला : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील वनोजा आणि कारंजा दरम्यान चॅनल क्र. २१५ जवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील जयस्वाल कुटुंबीय पुण्यात एका नामकरण समारंभासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते नागपूर (उमरेड)कडे परत येत होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार महामार्गावरील दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात वैदही जयस्वाल, माधुरी जयस्वाल, संगीता जयस्वाल आणि राधेश्याम जयस्वाल या एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघांचा घटनास्थळीच, तर अन्य दोघांची उपचारादरम्यान प्राण ज्योत मालवली. एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर वाशीम येथील रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील बचाव पथक आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

मेहकर येथे थांबले, अपघात टळला असता पण…

प्रवासादरम्यान जयस्वाल कुटुंबीयांनी मेहकर येथील नातेवाइकांच्या घरी थोडा वेळ विश्रांती घेतली होती. नातेवाइकांच्या विनंतीनंतरही ते थांबले नाहीत आणि पुढचा प्रवास सुरू केला. काही अंतर गेल्यानंतरच हा दुर्दैवी अपघात घडला. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

अत्याधुनिक पद्धतीने समृद्धी द्रुतगती महामार्ग तयार केल्या गेला आहे. नियमित घडणाऱ्या अपघातांमुळे मात्र या महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले. अपघातासाठी मानवी चुकांसह विविध कारणे समोर आली आहेत. यासाठी उपाययोजना देखील करण्यात आल्या. मात्र, तरी देखील अपघाताचे प्रमाण कमी झालेले नाही. समृद्धी महामार्गावरील प्रवास विनाअडथळा पूर्ण होतो. त्यामुळे वाहन चालक देखील निर्धास्त राहतात. लवकर प्रवास पूर्ण करण्यासाठी चालक थांबा न घेता अनेक तास वाहन चालवत असतात. थकव्यामुळे चालकाला डुलकी लागून अपघाताचा अनर्थ घडतो. बहुतांश अपघात हे चालकाला डुलकी लागल्यामुळेच घडल्याचे समोर आले.