वर्धा : वाघांचे अधिवास क्षेत्र ठरलेले. पण त्यास लांघून त्यांचा संचार सर्वत्र असतो, हे पण तितकेच खरे. सुप्रसिद्ध कॅटरीना वाघीण बोर सोडून सहसा जात नाही. पण एकदा ती थेट मध्यप्रदेशात पाहुणचार  घेऊन परत बोरला आल्याची नोंद झालेली आहे. तसेच बोर येथील वाघ पण उमरेड, चिमूर वरोरा, बुटीबोरी येथे जात असल्याची माहिती दिल्या जाते. तसेच ताडोबा येथील वाघ बोर तसेच समुद्रपूर तालुक्यातील गिरड वन क्षेत्रात सतत येत असतात. त्यामुळेच एकाच वेळी ११ वाघ भ्रमंती करीत असल्याची गिरड येथील घडामोड गत महिन्यात घडली.

काल शुक्रवारी एक एक ते दीड महिन्याचा बच्चा मृत अवस्थेत गिरड परिसरात आढळून आला आणि हळहळ व्यक्त झाली. हा कोणत्या वाघीनीचा बच्चा, यावर तर्क लावणे सूरू झाले. बोर किंवा गिरड क्षेत्रातील नसल्याचे स्पष्ट झाले. चिमूर वन क्षेत्रातील वाघीणच या बच्चा मादीची माता असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहे. कारण आता वाघीनीचे केवळ ठसे दिसून आले आहे. अंदाजानुसार चिमूर क्षेत्रातील वाघीण या परिसरात व्याली व बच्चे परत नेत असतांना एकाचा अपघाती मृत्यू झाला असावा, असा कयास लावल्या जात आहे.

या बच्चा मादीचे शव विच्छेदन झाले आहे. त्यात मेंदूला मार बसल्याने मृत्यू झाल्याचे नमूद आहे. वाघीण आपल्या तोंडात एकेक बच्चा पकडून अन्यत्र हलवीत असतांना एक बच्चा तोंडातून निसटला व त्याच त्याच्या डोक्याला मार बसून तो मृत्यू पावला, असे म्हटल्या जाते. असे बरेचदा घडत असल्याचे वन अधिकारी सांगतात.

या मादी बच्च्याचे शव विच्छेदन व अन्य सोपस्कार झाले तेव्हा मानद वन्य जीवरक्षक संजय इंगळे तिगावकर, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे ए. बी. गिरी, पीपल फॉर ऍनिमल्सचे गोडसे प्रामुख्याने हजर होते. हा शिकार किंवा अन्य घातपात प्रकार नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. वाघांचे संरक्षण ही वन खात्यासाठी सर्वोच्च प्राधान्य बाब समजल्या जाते. तसेच पशू व पर्यावरण प्रेमी पण वाघच नव्हे तर वन्य प्राण्यांच्या संरक्षणाबाबत दक्ष असतात. त्यामुळे मादी बच्चा असा मृत झाल्याने रुदन आहेच. याच समुद्रपूर वन क्षेत्रातील मंगरूळ सहवनक्षेत्रात सध्या सर्वत्र आला रे आला, वाघ आला अशी ओरड गावाकऱ्यात सूरू आहे. त्यामुळे पाच वाघ पकडण्याचे निर्देश पण आलेत. त्यापैकी दोन पकडल्या गेले. सध्या या भागात वन अधिकारी, कर्मचारी, पशुप्रेमी संस्थेचे कार्यकर्ते, डॉक्टर, शूटर हे तळ ठोकून बसल्याचे बघायला मिळते.