चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : जनावरांच्या ‘लम्पी’ आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना देशात जनावरांच्या एकूण संख्येच्या तुलनेत पशुचिकित्सकांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. देशात ४,४१६  जनावरांच्या मागे, तर महाराष्ट्रात २ हजार १८० जनावरांच्या मागे एक पशुचिकित्सक असल्याचे केंद्राची आकडेवारी सांगते. 

महाराष्ट्रातही  आतापर्यंत २४ जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रादुर्भाव झाला आहे.  केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार देशात देशात ७३,१२९ (३१ मार्च २०२० च्या नोंदीनुसार) नोंदणीकृत पशुवैद्यकीय चिकित्सक आहेत, त्यात महाराष्ट्रातील ९९७१ चिकित्सकांचा समावेश आहे.

देशातील आणि राज्यातील जनावरांची एकूण संख्या लक्षात घेतली तर उपलब्ध पशुचिकित्सकांची संख्या अपुरी असल्याचे स्पष्ट होते. देशात एकूण ३३.७५ कोटी पशुधन असून उपलब्ध चिकित्सकांची संख्या लक्षात घेतली तर ४,४१६  जनावरांच्या मागे एक चिकित्सक असे प्रमाण आहे. महाराष्ट्रात २.१७ कोटी पशुधन आहे. प्रमाण २ हजार १८० जनावरांच्या मागे एक पशुचिकित्सक असे आहे.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीने केवळ ‘वसुली सरकार’ म्हणून काम केले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आरोप

देशात पशुवैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी असणे हे यामागचे कारण असल्याचे सांगण्यात येते.  सध्या देशात २८ पशु व मत्स्य विद्यापीठांचे ५४ मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यात महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, परभणी, उद्गीर आणि शिरवळ (जि. सातारा) या पाच महाविद्यालयांचा समावेश आहे.

यासंदर्भात राज्य लम्पी चर्मरोग टास्क फोर्सचे सदस्य व पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूरचे विस्तार संचालक प्रा. अनिल भिकाने यासंदर्भात म्हणाले, पशुचिकित्सकांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.