अकोला : वाशीम जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने गुरुवारी हजेरी लावली. या वीज तांडवामध्ये एका तरुणीचा बळी गेला. पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेल्या तरुणीच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. इतर एक महिला वीज पडल्याने गंभीर जखमी झाली आहे.
वाशीम जिल्ह्यामध्ये गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. सोबतच विजांच्या कडकडाट देखील सुरू होता. वाशीम तालुक्यातील अनसिंग येथे दुपारी ४.१५ च्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. यादरम्यान शेती शिवारात असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या तनुजा अनिल खरात (वय १९ वर्ष) या तरुणीच्या अंगावर वीज पडली. त्यामध्ये तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सोबत असलेल्या गंगाबाई लाटे (वय ४० वर्ष) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना वाशीम येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. वाशीम तालुक्यातील अडोळी येथील सुभाष यशवंत इढोळे यांच्या मालकीच्या एका बैलाचा शेतात वीज पडून मूत्यू झाला. कारंजा येथील नागनाथ मंदिरावर वीज पडली. यामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मंगरूळपीर तालुक्यातील मौजा मसोला येथील पुरुषोत्तम दामोदर भगत यांच्या शेतामध्ये वीज पडून दोन गायीचा मृत्यू झाला, अशी माहिती वाशीमचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी दिली.
मोठ्या नाल्याला पूर; शेतकरी अडकले
कोठारी कवठळ परिसरात दरम्यान पाऊस पडल्यामुळे बोरव्हा ते कोठारी मर्गावरील मोठ्या नाल्याला पूर आला. बोरव्हा येथील शेतकरी शेतातील कामे आटोपून घरी येताना अडकले होते. काही वेळातच नाल्याचे पाणी कमी झाले. त्यानंतर लगेच शेतकरी सुखरूप बाहेर निघाले, असे शाहू भगत यांनी सांगितले.
शेतमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
वाशीम जिल्ह्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला होता. गुरुवारी दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे तो शेतमाल भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र बाजार समितीमध्ये दिसून आले. हे विदारक दृश्य पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.