अमरावती : राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रांमध्येही चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या विदर्भातील ६ मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. विदर्भात एकूण २६ मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा, नागपूर जिल्ह्यातील पेंच तोतलाडोह, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह, भंडारा जिल्ह्यातील गोसीखूर्द, आणि वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. वैनंगंगा, वर्धा आणि बेंबळा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ७४.११ टक्के, तर अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये ६०.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असून, हलक्या सरी कोसळत आहेत. पुढील तीन-चार दिवसदेखील असा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटसह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हेही वाचा.गजानन महाराजांची पालखी स्वगृही, श्रावणधारांत स्वागत; संतनगरी शेगावात… विदर्भातील सर्वच प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरणसाठ्यात वाढ झाली. अप्पर वर्धा धरणात १६.३७ टीएमसी (८३.७० टक्के) पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत ५४० मिमी पाऊस झाला आहे. या धरणातून २४ क्यूमेक विसर्ग सुरू आहे. बेंबळा प्रकल्पात ३.१८ टीएमसी (४८.९१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या धरणातून ८४ क्यूमेक पाणी सोडण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या १ जूनपासून ६५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पेंच तोतलाडोह प्रकल्पात ३२.१४ टीएमसी (८९.५१ टक्के) पाणीसाठा झाला असून ६३.३७ क्यूमेक विसर्ग सुरू आहे. हेही वाचा.‘वाजवा रे वाजवा, बँड वाजवा,’ काय आहे हा प्रकार? इटियाडोह प्रकल्पात ११.२३ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा झाला असून ७४.३८ क्यमेक विसर्ग सुरू आहे. गोसीखूर्द प्रकल्पात १०.७७ टीएमसी (४१.१९ टक्के) पाणीसाठा झाला आहे, तर २६५२.७० क्यमेक विसर्ग सुरू आहे. निम्न वर्धा प्रकल्पात ४.१९ टीएमसी (५४.६५ टक्के) पाणीसाठा झाला असून ४९.५१ क्यूमेक विसर्ग सुरू आहे. हेही वाचा.नागपुरात पोस्टर वॉर, काँग्रेसची गांधीगिरी इतर मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठा : अरूणावती ३.४० टीएमसी (५६.८३ टक्के), काटेपूर्णा २.६४ टीएमसी (८६.६६ टक्के), वान १.७२ टीएमसी (५९.४६ टक्के), पेनटाकळी ०.३५ टीएमसी (१६.६६ टक्के), बाघ-शिरपूर ४.६५ टीएमसी (८२.३४ टक्के), इरई ४.५९ टीएमसी (८५.२४ टक्के)