नागपूर : प्रदीर्घ काळ बंद असलेल्या शाळा आता पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी करोनाकाळातील ऑनलाईन शिक्षणाचे दुष्परिणाम आता दिसून येत असून अनेक मुलांमध्ये झोपेचे आजार बळावल्याचे निरीक्षण निद्रा व बालरोग तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
करोना काळात दोन वर्षे शाळा बंद होत्या. मुले मोबाईल, लॅपटाॅप, संगणकावर शिक्षण घेत होते. दुसरीकडे मैदानी खेळ बंद होते. त्याऐवजी मुलांमध्ये व्हिडीओ गेम खेळण्याचे प्रमाण वाढले. मोबाईलमधून ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन’ निघतात. ते लहान मुलांच्या मेंदूसाठी फारच हानिकारक ठरतात. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे डोकेदुखी, तणाव, निद्रानाश व कानाच्या पडद्यावरही परिणाम होतो, असे निद्रारोग व बालरोग तज्ज्ञांचे मत आहे.
आता शाळा ऑफलाईन झाल्या तरी मुलांच्या हातून मोबाईल सुटलेला नाही. त्याचा परिणाम मुलांच्या स्वभावावर झाला. त्यांची चिडचिड वाढली, अल्पवयीन मुला-मुलींमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. अनेक मुले रात्री लवकर झोपत नाहीत. झोपही सलग राहत नसल्याचे निरीक्षण पालक नोंदवत आहेत. काही जागरूक पालक मुलांना निद्रारोग तज्ज्ञ वा बालरोग तज्ज्ञांकडे नेतात. परंतु अशा पालकांची संख्या कमी आहे. अनेक पालक याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या मुलांना पुढच्या काळात या समस्येला अधिक तीव्रतेने तोंड द्यावे लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर नको
“मोबाईलमधून निघणाऱ्या नील किरणांमुळे झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे झोपण्याच्या एक तास आधी मोबाईलचा वापर करू नये. तसेच सकाळी उठल्यानंतर एक तासाने मोबाईल बघावा. जेवण करताना, झोपताना फोन जवळ ठेवू नये. ही काळजी घेतली तर झोपेचा आजार टाळता येतो. ”
– प्रा. डॉ. सुशांत मेश्राम निद्रारोग विभाग, सुपरस्पेशालिटी रुग्णालय.
एकाग्रतेवर परिणाम
मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. मुले अभ्यास करताना मोबाईलवर गेम खेळतात. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर करतात. याचा परिणाम अभ्यासावर होतो.
– डॉ. अविनाश गावंडे, बालरोग तज्ज्ञ.
अतिरेकी वापर धोकादायक
मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे झोपेच्या पद्धतीवर नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. मोबाईलमुळे सकाळी उशिरा उठण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून लठ्ठपणा वाढला. काही मुलांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाणही वाढत आहे.
– डॉ. श्रीती बेझलवार, होमिओपॅथी तज्ज्ञ.
चांगल्या झोपेसाठी हे करा…
– रोज वेळेवर उठा व वेळेवरच झोपा
– नियमित व्यायाम करा
– दिवसा १५ मिनिटांवर झोपू नका
– झोपून वाचणे, टीव्ही बघणे टाळा
– दुपारी ५ वाजेनंतर चहा किंवा कॉफी टाळा
– झोपण्याच्या एका तासापूर्वी टीव्ही, संगणक, मोबाईल बघू नका