लोकसत्ता टीम यवतमाळ : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात आज शुक्रवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्या टप्प्यात मतदानाने दोन आकडी टक्केवारीही गाठली नाही. सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.२३% इतके मतदान झाले होते. यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या राजश्री पाटील आणि महाविकास विकास आघाडीचे संजय देशमुख यांच्यात लढत होत आहे. त्यांच्यासह आणखी १७ उमेदवार रिंगणात आहेत. आणखी वाचा-अनिल देशमुख, सुनील केदार, अभिजित वंजारी वर्धा जिल्ह्यातून तडकाफडकी हद्दपार, जाणून घ्या कारण… आज, शुक्रवारी जिल्ह्यात दोन हजार २२५ मतदान केंद्रावर ही प्रकिया पार पडत आहे. जवळपास १९ लाख ४१ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लग्नसराई, तापमान यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना आज मात्र सकाळपासून ढगाळी वातावरण आहे. त्यामुळे सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदान उत्साहात होईल असे वाटत होते. परंतु ,सकाळी सात ते नऊ या दोन तासात जिल्ह्यात केवळ ७.२३% इतक्या मतदानाची नोंद झाली. अनेक मतदान केंद्रावर ज्येष्ठ आणि दिव्यांगानी हजेरी लावल्याचे दिसले. बसपा उमेदवार हरिसिंग राठोड, राळेगावचे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. आणखी वाचा-वाशीम : नवरदेवाने बोलल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क मतदानाची सुरुवात धिम्या गतीने झाल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र धाकधूक वाढली आहे. दुसऱ्या प्रहरात मतदारांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर आहे. लग्नसराई आणि वाढते ऊन याचा फटका मतदानाला बसला तर मात्र दोन्ही उमेदवारांसमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे.