नागपूर : वाघांच्या शिकारीनंतर त्याचे अवयव तस्करीसाठी वापरले जात असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर उघडकीस आला आहे. अहेरीपासून अवघ्या दोन किलोमीटरवरील टिकमपल्ली परिसरात संयुक्त कारवाई करत दोन किलो वाघाची हाडे आणि दोन सुळे जप्त करण्यात आले. या कारवाईत पॅंगोलिनची जिवंत मादी आणि तिचे पिल्लूही जप्त करण्यात आले असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

संयुक्त कारवाईतून तस्करी उघडकीस

ऑपरेशन सेफ पॅसेज ३.० आणि इंटरपोलच्या ऑपरेशन थंडर २०२६च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईमुळे महाराष्ट्र-तेलंगणा सीमाभागातून सुरू असलेल्या वन्यजीव तस्करीच्या मार्गांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. WCCBच्या पश्चिम विभागासह DRI, उदंती-सीतानदी व्याघ्रप्रकल्पाचे (USTR) अँटी-पोचिंग पथक आणि अहेरी वनविभागाने २६ सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. तीन दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, याच अहेरी परिसरात जूनमध्ये झालेल्या कारवाईत वाघांच्या अवयवांच्या तस्करीप्रकरणी दोन पोलिसांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे अहेरी-सिरोंचा-लिंगानूर-बिजापूर या परिसरातील वन्यजीव तस्करीचे मार्ग आणि त्यामागील नेटवर्क यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

वाघाची हाडे आणि सुळे सापडणे गंभीर

वाघाची हाडे आणि सुळे सापडणे ही या कारवाईतील सर्वाधिक गंभीर बाब आहे. पॅंगोलिनची तस्करी पकडणे हा कारवाईचा एक भाग असला, तरी वाघाचे अवयव मिळणे हे वाघांच्या शिकारीचा माग काढण्यासाठी महत्त्वाचा धागा आहे. हे अवयव नेमके कुठून आले, त्यासाठी वाघाची शिकार कुठे करण्यात आली, शिकारीत कोणाचा सहभाग होता आणि हाडे-सुळे पुढे कोणाकडे पाठवले जाणार होते, याचा तपास आता करावा लागणार आहे. केवळ अवयव जप्त करून कारवाई पूर्ण होणार नाही; या साखळीतील शिकारी, वाहतूकदार, मध्यस्थ आणि खरेदीदारापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे.

ऑपरेशन सेफ पॅसेज ३.० म्हणजे काय?

ऑपरेशन सेफ पॅसेज ३.० हे महाराष्ट्र-छत्तीसगड-तेलंगणा परिसरातील वन्यजीव तस्करीच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करणारे अभियान आहे. यापूर्वीच्या सेफ पॅसेज कारवायांमध्ये वाघाची कातडी, वाघाचा मृतदेह तसेच पॅंगोलिनचे खवले जप्त करण्यात आले होते. त्यानंतरच्या तपासातून अहेरी-सिरोंचा-लिंगानूर-बिजापूर पट्टा वन्यजीव तस्करीसाठी महत्त्वाचा असल्याचे समोर आले. याच पार्श्वभूमीवर आता सेफ पॅसेज ३.०मध्ये जिवंत पॅंगोलिन आणि वाघांच्या अवयवांच्या तस्करीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

ऑपरेशन थंडर २०२६ काय?

ही कारवाई इंटरपोलच्या ऑपरेशन थंडर २०२६च्या आंतरराष्ट्रीय मोहिमेचाही भाग आहे. वन्यजीव आणि वन गुन्ह्यांविरोधातील या मोहिमेत विविध देशांतील यंत्रणांमध्ये माहितीची देवाणघेवाण, लक्ष्यित कारवाई आणि आंतरराज्य-आंतरराष्ट्रीय तस्करीच्या नेटवर्कवर कारवाईवर भर आहे. अहेरीतील कारवाईत WCCBने वन्यजीव गुन्ह्यांशी संबंधित माहिती, DRIने आंतरराज्य तस्करीविरोधातील गुप्तवार्ता, USTRच्या पथकाने तस्करीच्या मार्गांबाबतची माहिती, तर अहेरी वनविभागाने स्थानिक पातळीवरील माहिती आणि प्रत्यक्ष कारवाईसाठी मदत केली.