नागपूर : विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मागितली होती. मागणी योग्य होती. तेथे काँग्रेसची ताकद आहे. पण, आता तो विषय संपला आहे. आघाडी म्हटल्यावर अशा गोष्टी घडत असतात. आता निवडणूक संपल्यानंतर वाद वाढवण्याची आवश्यकता नाही, असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेच्या जागेवरील उमेदवाराची परस्पर घोषणा केली. त्यावरुन काँग्रेस आणि  ठाकरे सेनेत विसंवाद निर्माण झाला होता. आमदार विश्वजीत कदम यांनी काँग्रेसला ही जागा मिळावी म्हणून धावाधाव केली होती.  अखेर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांनी विजयी पतका फडकावली.    परंतु, अजूनही सांगलीच्या जागेची चर्चा सुरूच आहे. विश्वजीत कदम यांनी एका कार्यक्रमात बोलताना काहींना काँग्रेस नेत्याची एकत बघवली नाही, असे भाष्य केले. मात्र, वडेट्टीवार यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>>चामुंडी कंपनी स्फोटातील बळींची संख्या आठवर, जखमी कामगाराचा मृत्यू , एकावर उपचार

महाविकास आघाडीची बैठक कशासाठी आहे माहीत नाही.  त्या बैठकीचे निमंत्रण नाही, मला त्या बैठकीचा अजेंडा माहीत नाही, असेही ते म्हणाले.वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर भाजपमधून होत असलेल्या टीकेबाबत भाष्य केले. ते म्हणाले, एखाद्या नेत्याला पक्षात घेऊन त्याला संपवायची भाजपची कार्यपद्धती आहे. जर तुम्हाला माहिती होते त्यांना पक्षात घेऊन पराभव होणार आहे, तर कशाला त्यांना पक्षात घेतले?   भाजप इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांच्या भरवशावर निवडणुकीला सामोरे जाते. त्यानंतर त्या नेत्यांना संपवायचे काम करते. ही भाजपची जुनी पद्धत आहे. अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश त्याच प्रक्रियेचा भाग आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>‘‘महायुती सरकारला महाराष्ट्रातून हाकलून लावणे हेच आमचे ध्येय,” नाना पटोले यांचे मत; म्हणाले…

 चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर खोटा प्रचार केल्याचा आरोप केला. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, खोटारडेपणा कोणी केला? दहा वर्ष लोकांची कोणी फसगत केली, संविधान बदलण्याची भाषा कोणत्या पक्षाची होती? शेतकरी उदध्वस्त झाला याला कोण जबाबदार? महागाई वाढली, उद्योगपतींचे कर्ज माफ केले, हा प्रचार खोटा कसा असू शकतो, याचे उत्तर भाजपने  द्यावे. भाजपला उत्तर देण्यासाठी आम्ही देखील यात्रा काढू, असेही वडेट्टीवार म्हणाले. भाजप जिथे जिथे खोटे सांगण्याचा प्रयत्न करेल, तिथे आम्ही खरे सांगण्याचा प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.