लोकसत्ता टीम

नागपूर : मोसमी पावसाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात प्रवेश केला. पण, हाच मोसमी पाऊस काही जिल्ह्यात दाखल झाला आणि त्याने विश्रांती घेतली. आता पुन्हा एकदा या मोसमी पावसाने राज्यातच नाही तर देशात पुढची वाटचाल सुरू केली आहे. विदर्भात येत्या २४ तासात मोसमी पावसाची हजेरी लागणार असून याठिकाणी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार अशी आठवड्याची अखेर पावसाळी असणार आहे.

मोसमी पावसाचे वारे पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विदर्भात येत्या २४ तासात तर संपूर्ण देशात ४८ तासात मोसमी पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून सर्वच जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे. यावेळी वादळ येण्याची शक्यता असून ताशी ४० ते ५० किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहतील, असेही खात्याने स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा-अमरावती : चक्‍क पाण्‍याखाली योगसाधना! पोलीस कर्मचाऱ्याची अनोखी कामगिरी

विदर्भासह कोकणातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील काही जिल्ळ्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. पश्चिम घाट परिसरातही पावसाचा जोर अधिक राहण्याची दाट शक्यता आहे. यावेळी काही भागात धुकेसदृश्य पाऊस राहील. किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचे वारे वाहतील आणि यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पुणे, सातारामध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

आणखी वाचा-नागपूर : पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट, राज्यव्यापी चिखलफेक आंदोलन

हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यात आज मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या ४८ तासात मोसमी पाऊस संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात मोसमी पावसाने हजेरी लावली असून काही भागात अजूनही प्रतिक्षा आहे. विदर्भातील अकोला, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर येथे मोसमी पावसाची घोषणा करण्यात आली.

मात्र, विदर्भाची राजधानी आणि राज्याची उपराजधानी म्हणून परिचित असलेले नागपूर तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अजूनही प्रतिक्षाच आहे. मोसमी पावसाची थांबलेली वाटचाल आता पुन्हा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष या पावसाकडे लागले आहे.