अकोला : यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र, या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण करतो. या अडचणीच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील गरजू रुग्णांसाठी आधार ठरत आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी ७९८ रुग्णांना १५.७९ कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली. यातून रुग्णांना नवजीवन प्राप्त झाले.
रुग्णांसाठी उपचाराची नवी आशा
अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे किडनी, यकृत, हृदय आणि फुप्फुस निकामी झालेल्या अनेक रुग्णांसाठी उपचाराची नवी आशा निर्माण झाली. या शस्त्रक्रियांसाठी खासगी रूग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने अनेक गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.
सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय कक्ष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची कार्यपद्धती रुग्णकेंद्रित करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतीसाठी रुग्णांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाइन प्रणालीही सुरू केली आहे. नव्या प्रणालीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना वैद्यकीय मदत अधिक वेगाने उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे, मदतीसाठीचा अर्ज आता रुग्णाऐवजी कक्षाशी संलग्न असलेल्या रुग्णालयामार्फत थेट सादर केला जातो. त्यामुळे रुग्णांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता राहिली नाही. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अर्ज मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण होत असल्याने गंभीर आजारांवरील उपचारांना गती मिळते.
मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे सर्वाधिक रुग्ण
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ६१७ रुग्णांना १२ कोटी २३ लाख ६६ हजार रुपयांची मदत देण्यात आली. यकृत प्रत्यारोपणासाठी १६२ रुग्णांना ३ कोटी २१ लाख ५० हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. फुप्फुस प्रत्यारोपणासाठी तीन रुग्णांना सहा लाख रूपयांची मदत देण्यात आली, तर हृदय प्रत्यारोपणासाठी १६ रुग्णांना २८ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, अशी माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
