गोंदिया: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करीत नाही. तर ज्या दिवशी त्यांचा राज्याभिषेक झाला होता, तो दिवस हिंदू साम्राज्य दिवस म्हणून साजरा करतो. त्याला कारण त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन अदम्य साहस, धैर्य व उत्साहाने परिपूर्ण अशा समाजाला संघटित करुन हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. मागील सातशे आठशे वर्षात कुणीही असा पराक्रम करु शकला नाही. संघाची स्थापना अशाच परिस्थितीत झाली असून भारत मातेला परमवैभवाकडे नेण्याचा उद्देश घेऊन संघटीत शक्तीची निर्मिती करीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विदर्भ प्रांत प्रथम वर्ष (सामान्य)  प्रशिक्षण वर्गाचा समारोपीय सोहळा व हिंदू साम्राज्य दिन उत्सवानिमित्त शनिवार ३ जून रोजी गोंदियातील लिटील वूड्स शाळेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षण वर्गाचे वर्गाधिकारी श्याम पत्तरकिने, जिल्हा संघचालक लीलाराम बोपचे व नगर संघचालक मिलींद अलोणी उपस्थित होते. प्रारंभी भारत माता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पुढे ते म्हणाले, हे विश्वची माझे घर म्हणजेच वसुदैव कुटूंबकम् मानणारा हिंदू हा धर्म नसून जीवन जगण्याची पद्धती आहे.

हेही वाचा >>> Samruddhi Highway Accident : ‘समृद्धी’वर विचित्र अपघात; वाहनातून खाली उतरले, तिघे जीवाला मुकले

उपासना पद्धतीचा हिंदूत्वाशी काहीच संबंध नसून या मातृभूमिसाठी जे समर्पित आहे, ते सर्व हिंदू आहेत. म्हणूनच प्रथम हिंदू, नंतर जात असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षाला प्रारंभ झाला आहे. महाराजांच्या प्रेरणादायी व कर्तृत्ववान ५१ वर्षाच्या आयुष्यात त्यानी ६ वर्ष युद्ध केले. तर ३० वर्ष सुशासनाने राज्य कारभार करुन हिंदू पदपादशाही निर्माण केली. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने संघ हे सामाजिक, सांस्कृतिक संघटन म्हणून ९८ वर्षांपासून कार्य करीत आहे. संघावरही अनेक आरोप लावण्यात आले, मात्र संघ ध्येर्य व कणखरपणे आपले कार्य करीत आहे.  प्रास्ताविकेतून  वर्गाधिकारी श्याम पत्तरकिने यांनी, मागील २० दिवसापासून सुरु असलेल्या संघ शिक्षा वर्गात विदर्भातील ७९ ठिकाणाहून १६ ते ४० वयोगटातील ३१८ स्वयंसेवक सहभागी झाल्याची माहिती दिली. दरम्यान, प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांनी दंड, नियुद्ध आदी प्रात्याक्षिक सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक व स्वयंसेवक उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organized society is important to take the country to greatness atul moghe sar 75 ysh
First published on: 04-06-2023 at 13:18 IST