साहित्य संमेलन आयोजकांच्या नव्या निर्णयाने नवकवींची अडचण

शफी पठाण, लोकसत्ता

नागपूर : मायबोलीच्या सोहळय़ात सहभागी व्हा, आपल्या सत्राबरोबरच तीन दिवस होणाऱ्या इतरही कार्यक्रमांचा आनंद घ्या, संमेलन संयोजन समिती तुमच्या प्रवासासह तीन दिवस निवास आणि भोजनाची व्यवस्था करणार आहे, असे ‘प्रेमळ आवतन’ धाडणाऱ्या उदगीर साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी अचानक निर्णय बदलला आहे. आता तीन दिवस नाही तर ज्या दिवशी सत्र असेल त्याच दिवसाची व्यवस्था करू, असा सुधारित निर्णय कवीकट्टय़ात सहभागी कवींना कळवण्यात आला आहे. परंतु, या कवींनी आधीच्या पत्रानुसार प्रवासाचे आरक्षण केल्याने त्यांची ऐनवेळी अडचण झाली आहे.

उदगीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २२ ते २४ एप्रिलदरम्यान होत आहे. या संमेलनात कवीकट्टय़ात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील नवोदित कवींना आयोजकांनी निमंत्रण पाठवले. त्यात त्यांची प्रवासासह तीनही दिवस निवास आणि भोजनाची व्यवस्था करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र आता तीन दिवस नाही तर एकच दिवस व्यवस्था करू, असा सुधारित निर्णय सहभागी सर्व कवींना कळवण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे आम्हाला आधीचा निर्णय बदलावा लागत असल्याचेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

सुधारित निर्णयाने निमंत्रित कवींची मोठीच अडचण झाली आहे. कारण, त्यांनी तीन दिवसांचा मुक्काम डोळय़ापुढे ठेवून रेल्वे आणि बस प्रवासाचे आरक्षण केले होते. आता ऐनवेळी नवीन आरक्षण मिळणे शक्य नाही. तरीही संमेलनाला जायचे धाडस केलेच तर मराठवाडय़ाच्या रखरखत्या उन्हाळय़ात उर्वरित दोन दिवस थांबायचे कुठे, हा प्रश्न या कवी- कवयित्रींना अस्वस्थ करीत आहे. यावर काहीतरी तोडगा काढा, अशी विनंती करणारे अनेक दूरध्वनी आयोजकांना जात आहेत. परंतु, आयोजक प्रतिसादच देत नसल्याची तक्रार निमंत्रित कवींनी केली आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरूके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी बैठकीत व्यग्र असल्याचे सांगून बोलणे टाळले.

व्हॉट्सअ‍ॅप समूहाला टाळे निमंत्रित कवींना वेळच्यावेळी सूचना पोहोचाव्यात, निरोप मिळावेत यासाठी आयोजकांनी कवीकट्टा नावाचा व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार केला होता. परंतु, तीन दिवस निवासाची व्यवस्था करण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर आता हा समूहच बंद करण्यात आला आहे.