वर्धा : पक्षी दुनियाच न्यारी. अवकाशात विहंग करीत क्षणात तळ्यात झेपावत भक्ष्य टिपणारे, रंगाची अनोखी दुनिया दाखविणारे, आंतरखंडिय प्रवास करणारे, समुद्र लंघन करीत असतांना वाटेतच अन्न वेचणारे, नाना आवाज काढीत मनुष्यास वेड लावणारे, किती वैशिष्ट्ये सांगावी. आता हा इटुकला त्यात नवी भर टाकतो. हा आहे ओरिएंटल ड्वॉर्फ किंगफिशर (Oriental Dwarf Kingfisher). भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक लहान पक्ष्यांपैकी हा एक आहे. महाराष्ट्रात आणि स्थानिक भाषेत याला ‘छोटा धीवर’ किंवा ‘तीन-बोटांचा धीवर’ (Three-toed Kingfisher) म्हणूनही ओळखले जाते.

शारीरिक रचना व स्वरूप

हा पक्षी अतिशय लहान (सुमारे १३ ते १४ सेमी) असतो. याचे वजन साधारणपणे १४ ते २० ग्रॅम दरम्यान असते. हा अतिशय रंगीबेरंगी पक्षी आहे. त्याची चोच आणि पाय गडद लाल/गुलाबी रंगाचे असतात. डोके आणि पाठीचा भाग गुलाबी-जांभळ्या छटांचा असतो. पंख गडद निळे व काळे असतात, तर पोट पिवळ्या किंवा केशरी रंगाचे असते. याच्या पायाला फक्त तीनच बोटे असतात, ज्यामुळे याला ‘Three-toed Kingfisher’ असेही म्हणतात.

अधिवास असा असतो

हा पक्षी दाट, दमट आणि हिरव्यागार उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये राहणे पसंत करतो. महाराष्ट्रातील कोकण भाग, पश्चिम घाट (सह्याद्रीची रांग) आणि मध्य भारतातील दाट जंगलांमध्ये (उदा. ताडोबा, मेळघाट, पेंच) हा प्रामुख्याने आढळून येतो. नावामध्ये ‘किंगफिशर’ (धीवर) असले तरी हा पक्षी फक्त माशांवर अवलंबून नसतो.

प्रमुख अन्न म्हणजे

हा जवळपास स्वतःच्या वजनाएव्हडे भक्ष्य टिपू शकतो. लहान बेडूक, कोळी (Spiders), पाल, गोगलगाय, टोळ, भुंगे आणि इतर लहान कीटक. हा पक्षी पाण्याजवळच्या किंवा जमिनीवरील लहान फांदीवर शांतपणे बसून राहतो आणि शिकार दिसताच वेगाने झेप घेऊन ती पकडतो.

हे पक्षी पाण्याच्या प्रवाहाजवळील किंवा ओढ्याकाठच्या मऊ मातीच्या पाडीमध्ये बोगद्यासारखे एक ते दीड फूट खोल बिळ (Tunnel) खोदतात आणि शेवटी अंडी घालण्यासाठी छोटी खोली तयार करतात. नर आणि मादी दोघेही मिळून अंडी उबवतात आणि पिल्लांना खाद्य पुरवतात.हा जंगलातील कीटक आणि लहान जीवांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. हा पक्षी अत्यंत चपळ आणि आकाराने लहान असल्याने दाट जंगलात त्याला थेट पाहणे थोडे कठीण असते, परंतु त्याच्या चमकदार रंगांमुळे पक्षीनिरीक्षकांमध्ये हा विशेष लोकप्रिय आहे.

वन्यजीव छायाचित्रकार पाळंदे

हा दुर्मिळ असा व्हीडिओ मुंबईचे वन्यजीव छायाचित्रकार तेजस पाळंदे यांनी उपलब्ध करून दिला आहे. गत १० वर्षांपासून या क्षेत्रात असलेल्या पाळंदे यांनी लोकसत्ता ऑनलाईनच्या पक्षीविषयक बातम्या वाचल्यात. त्यात स्वारस्य दाखवून त्यांनी संवाद साधतांना या किंगफिशरची माहिती दिली. हा व्हिडिओ टिपण्यास त्यांना अडीच तास ठाण मांडावे लागले. ते म्हणतात की अत्यंत सावध व उडण्यात वेग असणारा हा पक्षी असल्याने त्यास उडतांना कैद करणे महाकठीण. पिल्लं अतिउत्साही म्हणुन घरट्यातून पडतात व दगावतात, अशी माहिती पाळंदे देतात. १५ सेकंदाचा व्हीडिओ नजरेत येत नाही म्हणुन त्यांनी खास लोकसत्तासाठी तो स्लो मोशनमध्ये तयार करून दिला.