यवतमाळ : शहरात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे मराठी अस्मिता आणि ऐतिहासिक अभिमानाला ठेच पोहोचल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या भव्य भिंतीचित्रांपैकी एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांवर चुन्याने पांढरा रंग फासून त्यांचे चित्र पुसून टाकल्याचे गंभीर दृश्य समोर आले आहे.

​येथील बालाजी सोसायटी मार्गावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे, महाराजांच्या चित्रावर रंग फासलेला असताना, याच भिंतीवर असलेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र मात्र जसेच्या तसे ठेवण्यात आल्याने विविध शंका उपस्थित होत आहे.

​या दुहेरी कृतीमुळे संबंधित व्यक्तींचा हेतू शुद्ध नव्हता, तर त्यांनी जाणूनबुजून महाराजांचा अनादर केला असावा, असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत. यापूर्वी मराठा आरक्षणानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय पोस्टरवरून अनेक ठिकाणी वाद झाला होता. त्यावेळी काही ठिकाणी फडणवीस यांच्या छायाचित्रावर रंग फासून त्यांना हटवण्यात आले होते. परंतु, आता महाराजांचा चेहरा व राजमुद्राच पुसण्यात आल्याने आणि फडणवीसांचे छायाचित्र मात्र कायम ठेवल्याने या बाबत विविध चर्चा सुरू आहे.

महाराजांचेच चित्र पुसायची वेळ का आली? आणि फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांचे चित्र का ठेवले? असे प्रश्न प्रामुख्याने चर्चिले जात आहेत. सर्व समाजघटकांनी या अनादराचा निषेध केला असून, महाराजांचा अनादर करणाऱ्यांना लगेच शोधून कारवाई करा. हे प्रकरण राजकारणाचे नाही, आपल्या इतिहासाचे आहे, अशी एकमुखी मागणी यवतमाळच्या नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, सध्या नगर पालिकेची निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून, प्रशासनाकडून सर्वत्र राजकीय भित्तीचित्रं पुसण्यात किंवा झाकून ठेवण्यात येत आहे. तसाच प्रकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भित्ती चित्राबाबत घडला असावा, परंतु त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र बघून कर्मचाऱ्याची ते चित्र पुसण्याची हिंमत झाली नसावी, असेही बोलले जात आहे.

​या घटनेवर प्रतिक्रिया देताना समाजसेवी प्रा. पंढरी पाठे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. त्यांचे भिंतीवरील अस्तित्व पुसणे म्हणजे फक्त चित्राचा अपमान नाही, तर आपल्या इतिहासाचा आणि अस्मितेचा अपमान आहे, असे ते म्हणाले. याप्रकरणी प्रा. पाठे यांनी प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. यामागे कोणाचा आदेश होता आणि नेमका हेतू काय होता, हे तात्काळ स्पष्ट झाले पाहिजे. जबाबदारांवर कडक कारवाई करून जनतेत निर्माण झालेला असंतोष तातडीने शांत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असेही पाठे म्हणाले.