चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : देशातील राष्ट्रीय महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे यात घट दिसून येत आहे. मात्र २०१९ व २०२० या दोन वर्षांत  महामार्गावरील अपघातात १५ हजारांपेक्षा अधिक पादचारी व २ हजार ९०० सायकलस्वारांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

महामार्गालगतच्या गावांमध्ये अपघात टाळण्यासाठी संरक्षक कठडे आहेत. मात्र, अनेकदा शहरांतून जाणाऱ्या महामार्गावर वाहने अनियंत्रित झाल्याने  पादचाऱ्यांना प्राण गमवावे लागतात. तर ग्रामीण भागात रात्री सायकलस्वार न दिसल्याने अपघात होतात. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०१९-२०२० या करोनाकाळातील दोन वर्षांत देशभरात १५ हजार ३०४ पादचाऱ्यांचा, तर २,९०० सायकलस्वारांचा मृत्यू झाला. यात २०१९ मध्ये ७ हजार ७४९ पादचारी, १ हजार ६६८ सायकलस्वारांचा  व २०२० मध्ये ७ हजार ५५५ पादचाऱ्यांचा (महाराष्ट्रात ६८१, सायकलस्वार ५०) समावेश होता. करोनाकाळातील टाळेबंदीदरम्यान मोठय़ा प्रमाणात मजुरांचे स्थलांतर झाले. बहुतांश मजूर पायी जात होते. यापैकी अनेकांना अपघाताला तोंड द्यावे लागले होते.

महामार्गालगत दोन्ही बाजूंनी गावे असतात. गावकऱ्यांना रस्ते ओलांडता यावा, यासाठी पर्यायी रस्त्याची सोय असते; पण बरेचदा त्याचा वापर टाळला जातो. सायंकाळच्या सुमारास पादचाऱ्यांच्या अपघाताची शक्यता अधिक असते.  रात्री सायकलस्वार वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे दिवा किंवा चकाकणारी पट्टीचा वापर केला, तर अपघात टळू शकतात.

प्रा. विष्णू लागंडे, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तांत्रिक संस्था