चंद्रपूर:शेकडो कामगारांच्या हातांना रोजगार देणारा चंद्रपूर औद्योगिक वसाहतीतील मल्टी ऑरगॅनिक प्रा.लि. हा केमिकल तयार करणारा कारखाना मागील एक महिन्यापासून बंद असल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही कामगार संघटनांच्या अडेलतट्टू धोरणामुळे तसेच कंत्राटी कामगारांच्या संपामुळे हा कारखाना बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान यामुळे कंपनीचे दररोज कोट्यावधी रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
चंद्रपूर एमआयडीसीत आज घडीला मल्टी ऑरगॅनिक हा सर्वात मोठा कारखाना आहे. शेकडो कामगारांना या कारखान्यातून रोजगार मिळाला आहे. अनेकांचे कुटूंब व संसार या कारखान्यावर आहे. मागील अनेक वर्षापासून हा एकमेव कारखाना येथे अविरतपणे सुरू आहे. मात्र ५ नोव्हेंबर पासून हा कारखाना बंद आहे. आज एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी हा करखाना बंद होवून झालेला आहे. कंत्राटी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे हा कारखाना बंद असल्याचे सांगितले जात आहे.
या कारखान्यात केमिकलची निर्मिती होते. सदर केमिकल मुंबई, गुजरात तसेच देशाबाहेर देखील पाठविण्यात येते. मात्र उत्पादन ठप्प झाल्याने या कारखान्यातून इतरत्र होणारी निर्यात पूर्णत: बंद आहे. त्याचा परिणाम कंपनीला दररोज कोट्यावधीचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान यासंदर्भात मल्टी ऑरगॅनिक कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अलीम खान यांचेशी संपर्क साधला असता, कंत्राटी कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाला किंवा कामगार न्यायालयाला पूर्व सूचना न देता अचानक संप पुकारला आहे. त्यामुळे या प्रकरणी कंपनीने कामगार न्यायालयात केस दाखल केली आहे.
सध्या कारखाना बंद असला तरी नविन भरती प्रक्रिया राबवून लवकरच कारखाना सुरू केला जाईल अशी माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली. दरम्यान कारखाना बंद असल्यामुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. चंद्रपूर एमआयडीसी येथील हा एकमेव कारखाना गेल्य कित्येक वर्षापासून अविरत सुरू आहे. कंत्राटी कामगारांनी व्यवस्थापनाशी चर्चा करणे गरजेचे असतांना अचानक संपावर निघून गेल्याने कंपनीसमोर कारखाना बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असेही त्यांनी सांगितले.
