नागपूर : राज्यात वर्ष २०१९ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या साडेसहा वर्षात १ कोटी ५ लाख ८६ हजार ७३३ नागरिकांची सोल्युबिलीटी चाचणी करण्यात आली. यामध्ये १.१८ टक्के जण सिकलसेल वाहक असल्याचे आढळले. तर १२ हजार ४२० नवीन सिकलसेलचे रुग्ण नोंदवले गेले, असे आरोग्य विभागाच्या अहवालातून पुढे आले आहे. दरम्यान अहवालात आणखी काय निरीक्षण नोंदवले गेले? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

राज्यात सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम २००८ पासून आदिवासी व दुर्गम भागात राबवण्यात येत आहे. ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशीम, अकोला, छत्रपती संभाजीनगर, रायगड व हिंगोली या २१ जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत तपासणी, निदान व उपचार आणि नागरिकांमध्ये जनजागृती, मोफत सोल्युबिलिटी चाचणी, इलेक्ट्रोफोरेसिस व एच.पी.एल.सी. तपासणी, रुग्णांना मोफत औषधे, समुपदेशन, नियमित आरोग्य तपासणी, गरजेनुसार रक्त संक्रमण, टेलिमेडिसीनद्वारे तज्ज्ञांचा सल्ला आदी सुविधा पुरवल्या जातात. वर्ष २०१९ ते ३१ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान राज्यात १ कोटी ५ लाख ८६ हजार ७३३ नागरिकांची सोल्युबिलीटी तपासणी झाली. त्यात १ लाख २४ हजार २७५ (१.१८ टक्के) सिकलसेलचे वाहक आढळले. तर १२ हजार ४२० नवीन सिकेलसेलचे रुग्णही नोंदवले गेले. या आकडेवारीला आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. राज्यात सिकलसेल मुक्त महाराष्ट्रासाठी अरुणोदय ही विशेष मोहिम १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी राबवली जात आहे. त्यात आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे २१ जिल्ह्यातील सर्वच नागरिकांची सिकलसेल तपासणीचे नियोजन करण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

सिकलसेल म्हणजे काय?

सिकलसेल हा आनुवंशिक रक्त पेशीशी संबंधित आजार असून आई-वडिलांकडून अपत्यांना होतो. सिकलसेल रक्तपेशी या विळ्याच्या आकाराच्या ताठर असल्याने रक्तवाहिन्यात अडथळा निर्माण करतात. त्यामुळे रुग्णाला असह्य वेदना होतात. वारंवार अशा इजा झाल्यास अवयव निकामी होऊ शकतात. इतरही गुंतागुंत संभवते. सिकलसेल आजार नियंत्रणासाठी विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करणे गरजेचे आहे. सिकलसेलचे रुग्ण आणि वाहकांनी आपापसात लग्न टाळून निरोगी व्यक्तींशी विवाह करावा. सिकलसेलग्रस्त मातांनी गर्भधारणेनंतर आठ आठवड्यांच्या आत गर्भजल तपासणी करून घ्यावी. फाॅलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घ्याव्या, असे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.