यवतमाळ : जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य वाघांच्या समृद्ध संचाराने पर्यटकांना व्याघ्र सफारीसाठी कायम खुणावत असते. आता याच श्रेणीत उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्याची नोंद होत आहे. या अभयारण्यामधून वन्यजीवप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि उत्साहाची बातमी समोर आली आहे. अभयारण्यातील वाघांची संख्या वाढवणे आणि जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी वन विभागाने हाती घेतलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

‘जॉनी’ गेला, पण यांची ‘केमिस्ट्री’ जुळली

पैनगंगा अभयारण्यातील एकंबाच्या घनदाट जंगलात पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या एका नव्या वाघ आणि वाघिणीची ‘केमिस्ट्री’ जुळून आली असून, त्यांच्या या सुखद मिलनाने संपूर्ण वन विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही काळापूर्वी पैनगंगा अभयारण्यात वाघांची वंशवृद्धी व्हावी या उद्देशाने पेंच अभयारण्यातून एका वाघिणीला येथे आणण्यात आले होते. या अभयारण्यात आधीपासूनच ‘जॉनी’ नावाचा एक बलाढ्य वाघ वास्तव्य करत होता. या दोघांचे मिलन घडवून आणण्याचा वन विभागाचा मानस होता, परंतु अचानक ‘जॉनी’ हा वाघ गायब झाल्याने वन विभागाच्या या योजनेला सुरुवातीला काहीसा धक्का बसला.

गुप्त मोहीम आणि ‘त्याची’ एन्ट्री

असे असले तरी, निराश न होता वन्यजीव विभागाने अत्यंत गुप्तपणे एक नवी रणनीती आखली. या मोहिमेचा एक भाग म्हणून पेंच अभयारण्यातून तातडीने एका नव्या आणि तरुण नर वाघाला पैनगंगामध्ये सुरक्षितपणे आणण्यात आले. या संपूर्ण ट्रान्सलोकेशन (स्थलांतर) प्रक्रियेबाबत वन विभागाने कमालीची गोपनीयता पाळली होती. नव्या नर वाघाला आणि त्या वाघिणीला एकंबाच्या परिसरातील जंगलात सोडल्यानंतर वन कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या हालचालींवर अहोरात्र बारीक नजर ठेवली जात होती. ते कधी मस्तीच्या मूडमध्ये येतात याकडे वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्याच्या नजरा लागल्या होत्या.

आणि ‘तो’ क्षण कॅमेऱ्यात टिपला

यादरम्यान, या दोन्ही वाघांचा एक अत्यंत दुर्मिळ, मनमोहक आणि रोमहर्षक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात, जंगलातील कच्च्या रस्त्यावर हा नवा नर वाघ आणि वाघीण एकमेकांसोबत मनमोकळेपणाने खेळताना, प्रेमाची देवाणघेवाण करताना आणि कधी एकमेकांवर प्रेमाने डरकाळी फोडताना दिसून आले. जंगलाच्या शांत वातावरणात घुमणाऱ्या त्यांच्या डरकाळ्या आणि हा अनोखा रोमान्स पाहून वन्यजीव अधिकाऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

त्यांच्या ‘रोमान्स’मुळे नव्या पाहुण्याची चाहूल

पैनगंगा अभयारण्यामध्ये या नव्या जोडीच्या यशस्वी मिलनामुळे या अभयारण्यात लवकरच नवा पाहुणा दाखल होण्याची चाहूल वनविभागाला लागली आहे. या जोडीच्या मिलनामुळे छाव्यांचे आगमन होईल आणि अभयारण्याला नवी संजीवनी मिळेल, असा ठाम विश्वास आता वन्यजीव तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. अत्यंत गोपनीय आणि सुनियोजित पद्धतीने राबवलेली ही मोहीम आता प्रत्यक्ष यशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून, पैनगंगा अभयारण्यात एकंबाचे सुंदर जंगल या नव्या जोडीच्या प्रेमाचे आणि ऐतिहासिक मिलिनाचे साक्षीदार ठरले आहे. त्यामुळे भविष्यात टिपेश्वर प्रमाणेच पैनगंगाही वाघांच्या अधिवासामुळे समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.