अकोला : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यातील विविध शहरांमध्ये आज सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे. पाकिस्तानी गँगस्टार शहजाद भट्टी याच्याशी व टोळीतील गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधितांची झाडझडती घेतली जात आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यातून एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पाकिस्तानी गँगस्टरचे अकोला कनेक्शन आहे का? असा प्रश्न निर्माण झाला असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली.

नेमकं प्रकरण काय?

राज्यातील गँगस्टर टोळी विरोधात दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी सकाळपासून मोठी कारवाई सुरू केली. राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये एटीएसची पथके दाखल झाली असून टोळीशी संबंधित असल्याच्या संशयावर गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे. काही गँगस्टरच्या राज्यातील टोळीच्या माध्यमातून सुरू असलेल्या हालचालींवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम हाती घेतल्याची माहिती आहे. ही कारवाई पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोगर गँगशी संबंधित असल्याचे समजते. एटीएस पथकाच्या रडारवर टोळीशी संबंधित संशयित आहेत. या कारवाई प्रकरणात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

संशयिताची चौकशी

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यातील विविध शहरांसह अकोला जिल्ह्यात सुद्धा छापे टाकल्याची माहिती आहे. पथकाकडून झाडाझडती घेतली जात असून एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. तो संशयित मूळचा वाशीम जिल्ह्यातील असल्याचे कळते. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संशयितांवर नजर ठेवली जात आहे. मूळचे अकोला जिल्ह्यातील काही गुन्हेगारांचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. आता आणखी एका आंतरराष्ट्रीय टोळीची संबंधित संशयिताला जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याने आंतरराष्ट्रीय टोळीच्या कनेक्शनची चर्चा सुरू झाली. राज्यातील संघटित गुन्हेगारी आणि आंतरराष्ट्रीय टोळीशी कनेक्शन या विरोधात एटीएसने मोठे पाऊल उचलत कारवाई केली.

समाज माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न

राज्यातील काही तरुण आंतरराष्ट्रीय टोळीच्या संपर्कात असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी आहे. सध्या तो दुबईत राहून गँग चालवत असल्याचे कळते. देशातील तरुणांना कट्टरतावाद आणि हेरगिरीमध्ये ओढत असल्याचा धक्कादायक प्रकार कळताच धडक कारवाई केली जात आहे. विविध समाज माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याचे काम गुन्हेगारी टोळीकडून केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.